Power Station : खापरखेडा पॉवर स्टेशनचे राखमिश्रित पाणी शेतात, जमिनीतील मातीचे नमुने प्रयोगशाळेत, आता अहवालाची प्रतीक्षा
जमिनीतील मातीच्या परीक्षणानंतर नेमकं काय होणार हे स्पष्ट होईल, असं जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितलं.
नागपूर : जिल्ह्यात राखेचा बंधारा फुटून राख मिश्रित पाणी शेतात शिरलं होत. त्या जमिनीचे नमुने घेऊन ते नीरी (Neery) सारख्या प्रयोगशाळेकडे (Laboratory) तपासणीसाठी पाठविण्यात आलेत. त्या रिपोर्टवरून त्या जमिनीत शेती योग्य घटक आहे का हे तपासण्यात येणार आहे. नागपूर नजीकच्या खापरखेडा पॉवर स्टेशनमधून निघणाऱ्या राखेचा तलाव फुटून लाखो टन राख पाण्यासोबत शेतीमध्ये वाहत गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हजारो एकर जमीन यामुळे पडिक होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहे. राखीमध्ये असलेले बारीक-बारीक कण हे जमिनीला हानिकारक असतात. त्यामुळे मातीचा स्तर घसरुन परिणामी माती उपयोग शून्य होण्याची भीती असते. त्यामुळ या जमिनीतील मातीचे परीक्षण (Soil Testing) केल्यानंतर या मातीत नेमका किती फरक पडला. ही जमीन पीकं काढण्यासाठी सक्षम राहू शकणार की, नाही हे स्पष्ट होईल.
नमुने नीरीकडे तपासणीसाठी
महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यावर ही परिस्थिती आलीय. कोराडी, खापरखेडा, कामठी भागातील हजारो एकर शेतीवरील उभं पीक यामुळे वाहून गेलं आहे. शेतकरी हवालदिल झालाय. आता कृषी विभागाने बाधित जमिनीचे सॅम्पल जमा केलेत. नीरीसारख्या संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले आहे. त्याच्या रिपोर्टच्या आधारे पुढील दिशा ठरविली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जमितीनीतील मातीच्या परीक्षणाचे आदेश दिले होते. त्यांनी स्वतः या ठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर प्रशासन जोमात कामाला लागले.
जमीन नापिक झाल्यास जबाबदार कोण
शेतकऱ्यांचं हातच पीक तर गेलं. मात्र जमीन नापीक झाली तर भविष्यात शेती करायची कशी हा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर असणार आहे. त्यामुळे या प्रश्नांवर सरकारने विशेष लक्ष दिलंय. दोषींना शिक्षा आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे. जमिनीतील मातीच्या परीक्षणानंतर नेमकं काय होणार हे स्पष्ट होईल, असं जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितलं. पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची रिपोर्ट आल्यानंतरच आता स्पष्ट होईल की, ही जमीन शेतीसाठी उपयोगात कितपत येऊ शकते.