Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल, काय राहणार नवीन नियमावली?
नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल (Kovid Restrictions Relaxed) करण्यात आली आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना 200 ची मर्यादा नव्या नियमानुसार ठेवण्यात आली आहे. लग्न समारंभ, सोहळे 25 टक्के क्षमतेने सुरु राहतील. कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण बंधनकारक (Kovid Preventive Vaccination) करण्यात आले आहे.
नागपूर : राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन अधिनियमानुसार नागपूर जिल्ह्यात पहिल्या डोसचे 99 टक्के लसीकरण झाले आहे. दुसऱ्या डोसचे 71 टक्क्यांवर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (Kovid Preventive Vaccination) झाले आहे. तसेच कोविड पॉझिटीव्हीटी दरही तीनपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळं कोविड साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात आहे. कोविड निर्बंध शिथिल (Kovid Restrictions Relaxed) करण्यासाठी जिल्हा पात्र ठरलाय. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आर. विमला (Collector R. Vimala) यांनी हे आदेश जारी केलेत. त्यानुसार, आजपासून नागपूर महानगरपालिका क्षेत्र वगळून कोविड निर्बंध शिथिल केले आहेत. राष्ट्रीय उद्यान, सरकारी, बाग-बगीचे, प्रेक्षणीय, पर्यटनस्थळे, अम्युझमेंट पार्क, थीम पार्क पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील. जलतरण तलाव, जल उद्याने, किल्ले व इतर मनोरंजन स्थळे, ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटींग सलून हेही सुरू राहतील. तसेच वेलनेस सेंटर, जीम, रेस्टारंट, हॉटेल, उपहारगृहे, सिनेमागृह, नाट्यगृह ही नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
अंत्यसंस्कारासाठीची मर्यादा काढली
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे नियमित वेळेनुसार 25 टक्के क्षमतेने सुरू राहतील. किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल त्यानुसार सुरु राहतील. अंत्यसंस्कारासाठीची मर्यादा काढून घेतली आहे. नियमितपणे करता येईल. क्रीडा क्रियाकलाप – प्रेक्षकांशिवाय, नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल, शाळा व कॉलेज – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे 20 जोनवारीचे व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे 25 जानेवारी 2022 च्या शासन परिपत्रकानुसार तसेच आठवडी बाजार नियमित सुरु राहतील.
हे सर्व आदेश महापालिका क्षेत्र वगळून
या सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांचे, येणाऱ्या नागरिक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे तसेच खेळाडू व व्यवस्थापकांचे पूर्णपणे लसीकरण करणे अनिवार्य असेल. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियंत्रित अधिकाऱ्यांनी, व्यवस्थापकांनी कोविड संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने व कोविड योग्य वर्तनाची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे श्रीमती आर. विमला यांनी आदेशात म्हटले आहे. हे आदेश नागपूर जिल्ह्यासाठी (महानगर पालिका क्षेत्र वगळून) पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.