Nagpur NMC | एकला चलो रे! काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतल्या बैठका; स्वबळावर निवडणूक लढणार?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असं ठरलं.
नागपूर : मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होऊ शकतो. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बैठका घेणे सुरू केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असं ठरलं. दुसरीकडं राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल यांनीही बैठक घेत एकला चलो रेचा नारा दिला.
काँग्रेसचे 29 उमेदवार
मुंबईत नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यावर एकमत झालंय. अंतिम निर्णयासाठी यासंदर्भातील प्रस्ताव दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा झाली. मागील महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. दीडशेंपैकी फक्त 29 उमेदवार निवडून आले होते. नेत्यांमधील अंतर्गत भांडणे, उमेदवारी वेळेवर जाहीर केल्याने उडालेला गोंधळ व त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्षांवर झालेली शाईफेक याचा मोठा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता. विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील वर्चस्व काँग्रेसने मोडून काढले.
कुणाच्या सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका
राज्यात महाविकास आघाडी आहे हे विसरून जा. महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती आपल्याला आपल्याच ताकदीवर जिंकायची आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी आम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज असल्याचा इशारा काँग्रेसला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी गणेशपेठ येथील कार्यालयात पार पडली. बैठकीला पटेल यांच्यासह शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, शहर निरीक्षक राजेंद्र जैन, सुबोध मोहिते आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रफुल पटेल यांनी महापालिकेची निवडणूक आपल्याला आपल्याच बळावरच लढायची असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कुणाच्या सहकार्याची अपेक्षा बाळगू नका आणि गाफील राहू नका. सर्वच प्रभागासाठी तुल्यबळ उमेदवार शोधून ठेवा. प्रत्येकाला संधी मिळणार असल्याने आपसात बसून पॅनेल तयार करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला.