गांधींजी तेव्हाचे तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीस यांचं पुन्हा मोठं विधान
वेश्या व्यवसायाला देखील डिग्निटी मिळाली पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. वेश्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे मान सन्मान मिळाला पाहिजे.
नागपूर: तीन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. मात्र, अमृता फडणवीस यांनी या टीकेला भीक घातलेली नाहीये. त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला आहे. महात्मा गांधी हे तेव्हाचे राष्ट्रपिता होते. मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपुरात अभिरुप न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधण्यात आला. तेव्हा त्यांनी मोदींना थेट आधुनिक भारताचे राष्ट्रपिता म्हटलं. यावेळी त्यांनी विविध राजकीय प्रश्नांवर उत्तरे दिली. आदित्य ठाकरे हे रेश्माच्या गादीवर बसून आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
स्त्रियांवर अत्याचार होत आहे. देवेंद्र फडणवीस शांत आहेत. हे सरकार स्त्रियांवर अत्याचार करणारं आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्याचे मला वाईट वाटले. असं बोलण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला.
मी एक प्रोफेशनल बँकर आहे. मी कुणाला मदत केली तर माझी सॅलरी वाढणार नाही. पण मला विनाकारण टार्गेट केलं गेलं, असं त्या म्हणाल्या. अॅक्सिस बँकेत पोलिसांचे अकाऊंट उघडण्यात आले होते. अमृता फडणवीस यांना फायदा मिळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका झाली होती. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं.
गाणे गाणं ही माझी लहानपणापासूनची आवड आहे. मी गायिका होईल हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझे पती मुख्यमंत्री बनतील आणि मला मुंबईला यावं लागेल असंही वाटलं नव्हतं. गाणं गाताना तुमचे कोस्टार जर साक्षात अमिताभ बच्चन असतील तर तुम्ही घरी बसणार का? असा सवाल करतानाच मी गाणी म्हटली. पण पतीच्या पोझिशनचा फायदा उचलला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
रिव्हर अँथम हे सरकारचं गाणं नव्हतं. त्यासाठी खासगी पैसा लागला होता. हे गाणं लोकांना पटलं नाही. मला सोडून बाकी कुणालाच अभिनय जमला नाही. आमचा उद्देश चांगला होता, असंही त्या म्हणाल्या.
वेश्या व्यवसायाला देखील डिग्निटी मिळाली पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. वेश्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे मान सन्मान मिळाला पाहिजे. नव्या वेश्या तयार होऊ नयेत म्हणून दलालांवर कारवाई केली पाहिजे. अनेक महिला परिस्थितीमुळे या व्यवसायात ओढल्या जातात. त्यातून त्यांना बाहेर पडणं कठिण होतं. त्यांच्या मुलांसाठी काही तरी केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.