मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता महायुतीचे नेतेही पंतप्रधानांना भेटणार; रामदास आठवलेंचं मोठं विधान
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.
नागपूर: मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर आता राज्यातील महायुतीचे नेतेही पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचं रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. (mahayuti leaders to Meet pm narendra modi for maratha reservation)
रामदास आठवले आज नागपुरात आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना आठवले यांनी हे मोठं विधान केलं आहे. येत्या 20 जूननंतर युतीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि वादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात येईल. तसेच क्षत्रियांना 10 टक्के आरक्षण मिळावं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्याबाबतही मोदींशी चर्चा करण्यात येणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय आणि एसी, एसटीचा पदोन्नतीतील आरक्षण हे मोठे विषय आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला योग्य प्रकारे भूमिका मांडता आलेली नाही. मराठा समाज राज्यकर्ता आहे. श्रीमंत आहे. असं कोर्टाला वाटलं असावं. पण मराठा समाजात अनेक लोक गरीब आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यांना आरक्षण नाकारण्यात आलं आहे. 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण देता येऊ शकते. हे कोर्टाला पटवून देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
आघाडी सरकार दलित विरोधी
महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाबाबत घातकी भूमिका घ्यायला नको होती. हे सरकार दलित विरोधी आहे, असं सांगतानाच या सरकारमध्ये प्रचंड मतभेद आहेत. हे सरकार किती दिवस टीकेल हे सांगता येत नाही. प्रत्येक गोष्टीत या सरकारकडून केंद्राकडे बोट दाखविलं जातं, असं ते म्हणाले.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्या
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर हे सरकारच अस्तित्वात आलं नसतं. भाजपसोबतच सरकार स्थापन झालं असतं. आताही शिवेसना आणि भाजपने अडीच अडीच वर्षे सरकार स्थापन करण्याचा विचार करावा. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं. मोदींजींसोबत उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला ठाकरे यांनी स्वीकारावा, असं सांगतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही वाघासोबत दोस्ती करायला हरकत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे दोघांनीही आता पुढं यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
कोरोना काळात सरकारचे मोठे निर्णय
कोरोना महामारीत मोदी सरकारने अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोफत लस देण्याचा प्रयत्न केला आहे. या महामारीत अनेक मुलं अनाथ झाली आहेत. त्यांची जबाबदारी सरकारने घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं. (mahayuti leaders to Meet pm narendra modi for maratha reservation)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 June 2021https://t.co/mOqpKCmBqV
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं शिवसेनेकडून स्वागत, पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच – अरविंद सावंत
‘संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट लांबणीवर, उदयनराजे म्हणतात चुकीचा अर्थ काढू नका’
(mahayuti leaders to Meet pm narendra modi for maratha reservation)