मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात वाजलं; जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही ठेका घेतलाय…
येत्या 14 ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाची मराठा आरक्षणबाबत सभा पार पडणार आहे. त्या सभेच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी 12 जिल्ह्यांमध्ये दौरा काढलेला आहे. आज यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत.
रमेश चोंडके, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, हिंगोली | 1 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आमच्या आरक्षणात त्यांना वाटा नकोच, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. भुजबळांच्या या भूमिकेवर जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठ्यांना आरक्षण न देण्याचा ठेका तुम्ही चारपाच लोकांनी घेतला आहे काय?, असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच सरकारनेही आम्हाला चॉकलेट दाखवू नये, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणानंतर आता संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून जरांगे पाटील हे मराठा तरुणांना जागृत करत आहेत. त्यांना आरक्षणाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावागावात त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांच्यावर फुलांची उधळण केली जात आहे. तसेच त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी अबालवृद्ध आणि महिलाही मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. हिंगोलीच्या कळमनुरीत ते आज आले होते. यावेळी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्य सरकारलाही इशारा दिला.
मनात आणि मतात बदल करा
भुजबळ आमचे वैयक्तिक दुश्मन नाहीत. ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. तुमचं जीवमान उंचावलं. तेव्हा मराठ्यांनी तुम्हाला कधी विरोध केला नाही. तुमच्या प्रगतीच्या आणि आरक्षणाच्या आड आम्ही आलो नाही. मग आम्हाला मोठं करताना तुमची ही भावना अशी का? काय चुकीचं बोलतो आम्ही? असा सवाल करतानाच छगन भुजबळ यांनी त्यांच्या मतात आणि मनात बदल करावा. मराठा समाज त्यांच्या पाठी उभा राहील, असं जरांगे पाटील म्हणाले.
धक्का लागू देणार नाही… म्हणजे?
द्या मराठ्यांना आरक्षण, आम्ही तुमच्या पाठी राहू. पण ते तसं म्हणणार नाही. 50 टक्क्याच्या आत येऊ देणार नाही ही भाषा भुजबळ वापरत आहेत. मोठ्या नेत्यांनी असा शब्द वापरू नये. कुठे जायचं मराठ्यांनी? काय मराठ्यांनी केलं तुमचं? द्वेषच झाला ना हा? भुजबळ हे खासगीत किंवा इतर ठिकाणी बोलत नाहीत. तर आंदोलनाला भेट देताना बोलत आहेत. त्यामुळे लोकांचा उद्रेक होतो. त्यांच्या भावना भडकल्या जातात.
तुम्ही दोन्ही समाजाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे. धक्का लागू देणार नाही… म्हणजे? मराठ्यांनी तुम्हाला काहीच सहकार्य केलं नाही का आतापर्यंत? का ही भाषा वापरत आहात? काय कारण आहे? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना का द्यायचं नाही आरक्षण? तुम्ही चारपाच जणांनी मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्याचा ठेकाच घेतलाय का? असा सवाल त्यांनी केला.
अशी विधाने करू नका
भुजबळ संवैधानिक पदावर बसले आहेत. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी विधाने करू नयेत. उलट मराठ्यांना आरक्षण द्या हेच तुम्ही सांगितलं पाहिजे. मन मोठं केलं पाहिजे, असं सांगतानाच मराठा समाजाने शांततेनेच आंदोलने करावीत असं आवाहन मी करतो, असंही ते म्हणाले.
सरसकट आरक्षण द्या
मराठ्यांना सरसकटच आरक्षण दिलं पाहिजे. अर्धवट आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. देवेंद्र फडवणीस ही म्हणतात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. मराठ्याच्या मुळावर का उठला? तुम्ही मराठ्यांसोबत असं वागू नका. तुमच्या मनात बदल करा. सरकारने समजून घेणे गरजेचं आहे. सरकारने आरक्षणाच्या मुद्द्याला पूर्ण विराम द्यावा. सरकारने आम्हाला चॉकटेल दाखवू नये. पूर्ण आरक्षण द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
सोलापूर जिल्ह्यात पाच सभा
दरम्यान, येत्या 5 ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील यांची सोलापुरात सभा होणार आहे. शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात ही जाहीर सभा होणार आहे. सकल मराठा समाजाने या सभेचं आयोजन केलं आहे. सोलापूरसह जिल्ह्यात एकूण पाच सभा घेतल्या जाणार आहेत. मंगळवेढा, पंढरपूर, कुर्डुवाडी आणि बार्शीत या सभा होणार आहेत.