काळा-पिवळा गमछा, रुमाल असणाऱ्यांना नो एन्ट्री; ‘शासन आपल्या दारी’च्या पोस्टरला काळं फासलं
यवतमाळ येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि इतर व्हीव्हीआयपींसाठी दोन व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आल्या आहेत. यवतमाळ येथील हा कार्यक्रम ग्रामीण भागात आहे. कार्यक्रमाच्या स्थळी फार व्यवस्था नाही. त्यामुळे प्रोटोकॅाल म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी मुंबईवरून दोन व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विवेक गावंडे, गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, यवतमाळ | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक झाला आहे. गावागावात पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहने अडवली जात आहेत. तसेच भर रस्त्यात पुढाऱ्यांना जाबही विचारला जात आहे. पुढाऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांना जाबही विचारला जात असून कार्यक्रमात गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे अनेक पुढाऱ्यांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. मात्र, असं असतानाही यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असून अज्ञातांनी या कार्यक्रमाच्या पोस्टरला काळं फासलं आहे. सर्वच पोस्टरला काळं फासून या अज्ञातांनी निषेध व्यक्त केला आहे.
यवतमाळमध्ये आज सकाळी 11 वाजता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. साधारण 35 हजार लाभार्थ्यांना लाभाचं वाटप करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण छत्तीसगडच्या निवडणूक प्रचाराला जात असल्याने फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते या कार्यक्रमाला येणार नाहीत. तर दुसरीकडे अर्णीमध्ये अज्ञातांनी शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाच्या स्वागत पोस्टर्सना काळे फासले आहे. अर्णी रोडवर दुतर्फा हे पोस्टर्स लावण्यात आले होते. या सर्व पोस्टर्सना काळं फासण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नगर पालिकेकडून हे पोस्टर्स काढण्यात येत आहे.
गुन्हे दाखल करणार
कुणी तरी पोस्टर्सना काळे फासल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमात सत्यपाल महाराज यांचं कीर्तन होणार होतं. पण त्यांनीही तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द केला आहे. सत्यपाल महाराजांनी या कार्यक्रमाला येणार नसल्याचं सांगितल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे.
दरम्यान, यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जिथे जिथे गरजेचं आहे, तिथे सुरक्षा देण्यात आलीय आहे. ज्यांनी पोस्टर फाडले, काळं फासले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असं यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी सांगितलं.
काळा रुमाल, गमछा नो एन्ट्री
दरम्यान, कार्यक्रम स्थळी मराठा आंदोलक आंदोलन करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासन आपल्या दारी कार्यक्रमात सुरक्षेसाठी विशेष जाळ्या लावण्यात आल्या आहेत. शिवाय येणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करण्यात आले असून त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्टेजपर्यंत कुणी पोहोचणार नाही. याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना सोडलं जात आहे. काळा रुमाल, काळा गमछा, पिवळा गमछा घालून आलेल्यांना प्रवेश नाकारला जात आहे.