नागपूर: पावसाने संपूर्ण राज्याला झोडपले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायचा की फक्त काही जिल्ह्यांत ओला दुष्काळ करायचा याचा विचार सुरू आहे, असं सांगतानाच अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही भीती व्यक्त केली. शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकारने दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होईल. राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत होईल. ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा की संपूर्ण राज्यात जाहीर करायचा याबाबत विचार सुरू आहे. जिल्ह्यांमधील नुकसानीची माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी संकटात आला की सर्वच पक्षाची शेतकऱ्यांना मदतीची मागणी असते. मराठवाड्यात 17 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्याहीपेक्षा अधिक नुकसान झालेलं असू शकतं, असं त्यांनी सांगितलं. पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी महापुराचं खापर जलयुक्त शिवारावर फोडलं आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतुल देऊळगावकर तज्ज्ञ आहेत. त्यांची मतं काय आहेत त्यावर विचार होईल, असं ते म्हणाले.
विजय जावंधिया यांनी व्यक्त केलेलं मत खरं आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. मराठवाड्यातील कापूस, सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे, असं ते म्हणाले. कर्ज काढण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, असंही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. गावातील समस्यांचा निपटारा गावात जावून करण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रशासन एका ठिकाणी बसून गावातील ग्राम सभेत बसून समस्या सोडवतील. २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यासह एकूण 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 30 September 2021https://t.co/YxYKSsEAi4#mahafast100newsbulletin #mahafast100news #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2021
संबंधित बातम्या:
पोकळ शब्द किंवा आश्वासने नको, पूरग्रस्तांना तातडीने मदत करा; देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारला आवाहन
तडाखेबंद पावसानं नाशिकमध्ये 14 धरणे फुल्ल; वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार!
लोकसभेला उदयनराजेंना पाडलं, आता एकाचवेळी दोन्ही राजेंना हरवणार, राष्ट्रवादीचा साताऱ्यात मेगाप्लॅन
(Minister Vijay Wadettiwar On Damage From Flood In marathwada)