MLC Election | नागपूर, अकोल्यात मतमोजणीला सुरुवात; नागपुरात बावनकुळे गड राखणार?
निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. तीन उमेदवार असले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांचं पारड जड आहे. बावनकुळे यांनी काल मानकापूरच्या मंदिरात पूजाही केली.
नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणूक मतमोजणीला आठ वाजता होणार सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवनमध्ये मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज आहे. ११ वाजतापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. चार टेबलवर मतमोजणीची तयारी झाली आहे. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त आहे. निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. तीन उमेदवार असले तरी चंद्रशेखर बावनकुळे यांचं पारड जड आहे. बावनकुळे यांनी काल मानकापूरच्या मंदिरात पूजाही केली.
मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आठ वाजता सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. यात 283 महिला आणि 271 पुरुष मतदारांचा समावेश होता. एकूण 560 पैकी 554 मतदारांनी मताधिकार बजावला आहे.
वैध मतदानाच्या आधारे कोटा
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रविंद्र भोयर व अपक्ष मंगेश देशमुख हे उमेदवार आहेत. मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा निश्चित करण्यात येईल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळून कोटा पूर्ण होईल तो उमेदवार विजयी घोषित करण्यात येईल. परंतु पहिल्या पसंतीची मते मिळून एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही. तर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या आधारे मतमोजणी होईल. यात कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होईल. मतमोजणीच्या वेळी अगोदर अवैध मते शोधण्यात येतील. प्रथम पसंतीक्रम न दर्शविणे, पसंतीक्रम शब्दात नोंदविणे, चुकीच्या पध्दतीने क्रमांक लिहिणे, वेगळा पेन वापरणे इत्यादी कारणांमुळे मत अवैध ठरु शकते. मतमोजणीच्या सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करुन अवैध मते बाजूला करण्यात येणार आहे. 4 टेबलवर मतमोजणी होणार आहे.
200 मीटर क्षेत्र प्रतिबंधित
जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन पारिसरात प्रवेशपत्र असणाऱ्या व्यक्तींनाच मुख्य प्रवेशव्दारातून परवानगी मिळणार आहे. अन्य अभ्यागत व कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील प्रवेशव्दारातून परवानगी दिली जाणार आहे. 200 मीटर क्षेत्र प्रतिबंधित असून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बचतभवन येथे मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला.