नोटीस झुगारली, वीज कर्मचाऱ्यांचा आधी ‘शॉक’ नंतर ‘निदर्शने’; संपावर गेलेले वीज कर्मचारी एकवटले
साताऱ्यातही वीज कर्मचारी महावितरणच्या कार्यालयाबाहेर जमले असून त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. मुंबईत वांद्रे येथील प्रकाशगड येथेही वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
नागपूर: महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. तीन दिवस हे कर्मचारी संपावर असणार आहेत. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच वीज कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे राज्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी आधी संपावर जाण्याचा शॉक दिल्यानंतर आता नागपूरच्या कोराडी वीज केंद्राबाहेर जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.
महावितरणच्या खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. त्यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. वीज कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संप पुकारल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या नोटिशींना झुगारून वीज कर्मचारी संपावर गेले आहे.
आज सकाळीच वीज कर्मचारी नागपूरच्या कोराडी औष्णिक वीज केंद्रावर जमले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही संप मागे घेणार नाही. सरकारनेच आपला प्रस्ताव मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी वीज कर्मचारी करत आहेत.
साताऱ्यातही वीज कर्मचारी महावितरणच्या कार्यालयाबाहेर जमले असून त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. मुंबईत वांद्रे येथील प्रकाशगड येथेही वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
दरम्यान, वीज कर्माचऱ्यांनी संप पुकारल्याने राज्यात अनेक भागात अंधार पसरला. काही ठिकाणी मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते काही ठिकाणी रात्री 3 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. पाच तास झाले तरी वीज सुरू न झाल्याने लोक संतापले आहेत.
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. संपामुळे 210 मेगावॅट क्षमतेचे युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद आहे. युनिट 4 मध्ये एअर हीटरची समस्या उद्भवली आहे.
तर युनिट 5 मध्ये कोळश्याची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात बंद करण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सध्या कंत्राटी कामगारांवर महावितरणची सर्व भिस्त आहे.
गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
कराडच्या कोयनानगर येथील वीज निर्मिती पावर हाउसमधील 36 मेगावॅटची दोन युनिट बंद झाली आहेत. कर्मचाऱ्यांविना युनिट झाले आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका वीज निर्मितीवर झाला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वीज निर्मिती थांबली आहे.