24 तासांत 3 हत्या! उपराजधानी हादरली, गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगार बेलगाम
24 तासांत 3 हत्येच्या घटनांनी उपराजधानी नागपूर शहर चांगलंच हादरलंय.
नागपूर: 24 तासांत 3 हत्येच्या घटनांनी उपराजधानी नागपूर शहर चांगलंच हादरलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर गुन्हेगारी विश्वानं मोठं आव्हान उभं केलं आहे. कारण, नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी ठरताना दिसत आहे. यापूर्वीही 16 नोव्हेंबर 2020 रोजी अशाचप्रकारे 24 तासांत हत्येचे 3 प्रकार घडले होते. (Three murders on the same day in Nagpur city)
हत्येची पहिली घटना कळमना अंतर्गत डिप्टी सिग्नल वस्तीत डिजेच्या जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाची चाकूरे वार करुन हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. विनय राजेश डहारे असं मृत तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 16 वर्षाचा होता. या प्रकरणी कळमना पोलिसांनी योगेश वंजारे (वय 20) आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या विनयचा डिजेच्या कारणावरुन आरोपींशी वाद झाला होता. शुक्रवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला. विनयच्या मित्रांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सुचना केली होती. पण त्याने तक्रार करण्याऐवजी वाद मिटवण्यावर भर दिला. रात्री 9च्या सुमारास आरोपींनी विनयला गाठून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर विनयला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गिट्टीखदान आणि कामाठी परिसरात दोन हत्या
दुसरी घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. छऱ्याच्या बंदुकीतून सुटलेला छऱ्या डोळ्याला लागल्यानं लोकेश गजभिये यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. तर तिसरी घटना कामाठी इथल्या बस स्टॅन्ड चौकात घडली आहे. कुंदन वंजारी या इसमाचा मृत्यू झाला. आरोपी करण वानखेडे असल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वी ऐन दिवाळीत एका दिवसात तीन हत्या घडल्या होत्या. त्याच आठवड्यात नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये हत्येचे एकूण 7 प्रकार घडले होते. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात गुन्हेगारी बेलगामपणे सुरु असल्याचं पाहयला मिळत आहे.
संबंधित बातम्या:
पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना
क्षुल्लक भांडणात कुटुंबातच रंगला खुनी खेळ, एकाची हत्या, पोलिसांमुळे थोडक्यात बचावली महिला
Three murders on the same day in Nagpur city