जोपर्यंत एखादी श्रीदेवी गडकरींच्या साबणामुळे गोरी झाल्याचं सांगत नाही… नितीन गडकरी यांनी सांगितलं मार्केटिंगचं तंत्र
शेती क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जमीन चांगली करणे, कसदार करणे आवश्यक आहेच. त्यानंतर दर्जेदार रोप तयार करणे आणि आपलं उत्पादन वाढवणे हे शेतीतल्या यशाचे एक भाग आहे.
नागपूर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे नेहमी नव्याचा शोध घेत असतात. नव्या तंत्राचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल यावर त्यांचा भर असतो. मग रस्ते असो, शेती असो, मार्केटिंग की वाहनांचा विषय असो… प्रत्येक क्षेत्रात नवीन नवीन गोष्टींचा अवलंब कसा करता येईल याचा ते सतत ध्यास धरत असतात. त्यासाठी ते अत्यंत सोप्या भाषेत संबंधित तंत्राची माहिती देत असतात. काल त्यांनी मार्केटिंग या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. एखादं उत्पादन कसं विकावं याचं तंत्र आपल्या खास नर्मविनोदी शैलीत त्यांनी समजावून सांगितलं. हे सांगताना त्यांनी थेट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा उल्लेख केला.
Addressing workshop of the Orange and Mosambi farmers at Agrovision 2022, Nagpur https://t.co/zhguChISjx
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 26, 2022
नागपुरात संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या अग्रो व्हिजन 2022 या कार्यक्रमात नितीन गडकरी काल बोलत होते. यावेळी त्यांनी मार्केटिंगचं तंत्र अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं. आम्ही साखरेपासून साबण बनवतो. त्याला भारतापेक्षा विदेशात चांगलं मार्केट मिळालं. एक्स्पोर्टचं मार्केट मिळालं. रेटही चांगला मिळाला, असं नितीन गडकरी म्हणाले.
साखरेपासून बनवलेल्या साबणाला आपल्या देशातही मार्केट मिळालं. पण अॅडव्हराटायझमेंट करावी लागते. कोणी तरी श्रीदेवी सांगत नाही गडकरींकडचं साबण लावलं आणि माझं अंग गोरं झालं, तोपर्यंत गल्लीतील श्रीदेवी काही साबण वापरत नाही. मग ते कितीही चांगलं असो, असं गडकरी यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
मार्केटमध्ये एखादं उत्पादन विकणं ही कला आहे. चांगलं असून चालत नाही तर चांगलं पॅकेजिंग पाहिजे. चांगलं असणं उपयोगाचं नाही. चांगलं दिसणंही महत्त्वाचं आहे. पॅकेजिंग महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
आपण सर्व मिळून विदर्भाचा एक ब्रँड तयार करू. एक कंपनी निर्माण करू आणि त्याचं आपण इंटरनॅशनल लेव्हलवर मार्केटिंग करू. ते करता येईल. यात काही कठिण नाही. हे आपण केलं तर मार्केट मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
परवा मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो. तिथे हेलिकॉप्टरने गेलो होतो. त्यांनी मला एक लिक्विड दिलं. आद्रक आणि पेरूचा ज्यूस होता तो. सीओटू होतं त्यात. फारच टेस्टी होतं. मी तो फॉर्म्युला ऑस्ट्रेलियातून आणला.
आपल्याकडे सर्वच आहे. सीओटू आहे, साखर आहे आणि पाणीही आहे. त्यातून आपल्याकडे सध्या ब्रँडी, व्हिस्की आणि रम बनवतात. मी म्हटलं ते बनवत राहा. पण हा ज्यूस बनवून पाहा. हे आमच्या कामाचं आहे. ते काही आपल्या कामाचं नाही, असं त्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
या ज्यूसचा फॉर्म्युला जो तयार करतो, त्याचा दहा लाख रुपये महिना पगार आहे. तो फक्त चमच्याने चव घेत राहतो. आमच्याकडे आहे तो. डॉक्टरेट आहे. तो फक्त ब्रँडी, व्हिस्की आणि रमची टेस्ट घेत असतो. खरं तर प्रत्येकाची एक स्किल्ड आहे, असं सांगतानाच कोणताही माल खपवण्यासाठी फॉर्म्युला, क्वालिटी आणि ब्रँडिंग महत्त्वाचं आहे. आपण संत्र्यांचा ज्यूस आणि ब्रँडिंग करूया, असंही ते म्हणाले.
शेती क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जमीन चांगली करणे, कसदार करणे आवश्यक आहेच. त्यानंतर दर्जेदार रोप तयार करणे आणि आपलं उत्पादन वाढवणे हे शेतीतल्या यशाचे एक भाग आहे. तर झालेल्या उत्पादनाची चांगली मार्केटिंग करणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
त्यासाठी ब्रॅण्डिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे संत्रा आणि मोसंबी पासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी “नागपूर ऑरेंज” नावाची एक ब्रँड तयार करावी असा सल्लाही यावेळी गडकरींनी दिला.