OBC Federation | ओबीसी आरक्षण लागू करेपर्यंत निवडणुका नको, महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं नागपुरात मोठं विधान
राज्यप्रमाणे केंद्राने ओबीसी मंत्रालय (Ministry of OBC) सुरू करावं अशी मागणी आहे. आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक घेऊ नये. शाहू महाराजांचे स्मारक कोल्हापूरला व्हावं, अशी अपेक्षाही तायवाडे यांनी व्यक्त केली.

नागपूर : बबनराव तायवाडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे (National OBC Federation) नागपूर जिल्हा अधिवेशन कामठी तालुक्यातील गादा येथे होत आहे. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) म्हणाले, देशाच्या संविधानात ओबीसींसाठी 3 कलम टाकले होते. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणात आरक्षणाची व्यवस्था केली. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू झालं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळालं. मात्र आता त्यावर गदा आली. या कार्यक्रमात काँग्रेस भाजपचे नेते आहेत. तुम्ही राजकारण राजकारणाच्या व्यासपीठावर करा. पण ओबीसींच्या मंचावर ओबीसींचा विचार करा. राजकीय मतभेद विसरून ओबीसींसाठी काम करा, असं आवाहन तायवाडे यांनी केले. तायवाडे म्हणाले, महाज्योतीचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. ओबीसींची राजकीय जनगणना करावी. राज्यप्रमाणे केंद्राने ओबीसी मंत्रालय (Ministry of OBC) सुरू करावं अशी मागणी आहे. आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक घेऊ नये. शाहू महाराजांचे स्मारक कोल्हापूरला व्हावं, अशी अपेक्षाही तायवाडे यांनी व्यक्त केली.
खासगीकरण झाल्यास आरक्षण संपण्याचा धोका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, 60 टक्के समाज असताना सुद्धा आपल्याला आरक्षण मागावं लागतं असेल तर ती मजबुरी आहे. राजकीय मतभेद विसरून आपण समाजासाठी पुढे आलं पाहिजे. मात्र आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी मुलांना स्वतंत्र वसतिगृह असायलाच पाहिजे. विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिलं ते पूर्ण करतील. सध्या खाजगीकरण करण्याची योजना सुरू आहे. त्याचा विरोध आपण केला पाहिजे. कारण खाजगीकरण झालं तर आरक्षण संपणार, अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली. म्हणून सगळ्यांनी यात सहभागी व्हावं. मी राजकीय जोडे बाहेर काढून या मंचावर आलो. शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्याने चांगलं धोरणं आणावं. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या जन्म ठिकाणी गेलो त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक बनवायला पाहिजे याचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन नाना पटोले यांनी दिलं.
जागृत होणे गरजेचे
आमदार परिणय फुके म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर या सरकारची स्थापना झाली. ठराव आणला मात्र त्याच काहीचं झालं नाही. या सरकारने निधी दिला नाही. सुप्रीम कोर्टात ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्ठात आलं. त्याप्रमाणे शैक्षणिक आरक्षणसुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे आता तरी जागृत होण्याची गरज आहे.