लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पहिला झटका… माजी आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी; ‘या’ पक्षात करणार प्रवेश
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिला आहे. कुथे हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मात्र, कुथे यांनी अजून कोणतेही पत्ते उघडलेले नाहीत. विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळाल्याने कुथे हे काँग्रेसमध्येच जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
भाजपमध्ये आता उलटी गंगा वाहायला सुरुवात झाली आहे. लोकसभेतील पराभवानंतर भाजपला पहिला झटका बसला आहे. भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी आमदार रमेश कुथे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रमेश कुथे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कुथे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुथे यांचा कल काँग्रेसकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
रमेश कुथे हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी भाजपला रामराम केला आहे. रमेश कुथे हे पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेतून ते दोनदा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण केलं नाही, असं सांगतानाच पक्षात आलेल्या नवीन लोकांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप माजी आमदार रमेश कुथे यांनी केला आहे.
बावनकुळे यांचं भाषण ऐकलं अन्…
नागपूरमध्ये देशपांडे सभागृहात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण झालं. पूर्व विदर्भाच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बावनकुळे यांनी आमच्याकडे लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं सांगितलं. आमच्याकडे अनेक जण येत आहेत. त्यांच्या मागण्याही घेऊन येत आहेत. त्यामुळे जे येतात त्यांना हो बोलतो. जे काही मागतात त्यांनाही हो बोलतो. पण आपण काही सर्वांना खूश करू शकत नाही. म्हणूनच आपल्याकडे येतील 100 आणि परत जातील पाच. पण पाच गेले तरी आपण 95 प्लस राहू, असं बावनकुळे म्हणाले होते. बावनकुळे यांचं हे भाषण ऐकल्यानंतर पक्षात आपली काही गरज नाही याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्याला मूर्ख बनवलं गेलं आहे. तेव्हाच पक्ष सोडण्याचा विचार मनात आला आणि तो दिवस काल उगवला, असं कुथे म्हणाले.
भाजप ओबीसी विरोधी
भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे. या पक्षात ओबीसींच्या हिताचं काहीच बोललं जात नाही. मराठा असो की ओबीसी यांच्या वादात भाजप आपले हात धुवून घेत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
पटोलेंनी ऑफर दिली
माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे नाना पटोले मला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यावर मी त्यांना विचार करतो म्हणून सांगितलं. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा भाजप सोडण्याचा सर्वांचा आग्रह पडला. लवकरात लवकर भाजप सोडा, असं कार्यकर्ते म्हणत होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेवर प्रेम
समोरच्यांच्या भूमिकेबाबत मी काही बोलू शकत नाही. शिवसेनेवर माझं आजही प्रेम आहे. नाना पटोले यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी अधिक काही भाष्य करू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.