शिंदे सरकारची चिंता वाढवणारी बातमी, ओबीसी नेत्यांचा मोठा निर्णय, राज्य शासनाच्या अडचणी वाढणार?
मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु असताना आता राज्यातील ओबीसी नेते देखील आक्रमक झाले आहेत. राज्यातील ओबीसी नेत्यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर | 8 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी-मराठा जातप्रमाणपत्र देवून त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या, अशी त्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे निजामकाळात मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी असं जात प्रमाणपत्र देण्यात येत होतं. पण निजाम संस्थान महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण गेलं. तेव्हापासून आरक्षणाची आमची लढाई सुरु असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने जीआरदेखील काढला आहे. या जीआरमध्ये सरकारने ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत, त्यामध्ये कुणबी वंशावळ असा उल्लेख असेल त्यांना मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्र दिलं जाईल, असं सरकारने म्हटलं आहे. पण सरकारच्या या निर्णयाला राज्यातील ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण देऊ नका, अशी त्यांची भूमिका आहे. यासाठी हे नेते आक्रमक झाले आहेत.
ओबीसी नेत्यांची आज नागपुरात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे आता राज्यातील ओबीसी नेते संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार असल्याने सरकारची चिंता वाढणार आहे.
ओबीसी नेत्यांचा बैठकीत नेमका निर्णय काय?
ओबीसी नेत्यांनी आजच्या बैठकीत उद्यापासून राज्यभर आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलाय. ओबीसी नेते उद्या राज्यभर आंदोलन पुकारणार आहेत. ओबीसी नेत्यांची आज नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत उद्यापासून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुणबी-मराठा समाजाला आमच्यातील आरक्षण देऊ नका हीच महत्त्वाची मागणी या नेत्यांची आहे. तसेच मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असं या नेत्यांचं म्हणणं आहे.
या बैठकीला अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, ओबीसी नेते राजेश काकडे यांनी बैठकीनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. सखल कुणबी संघाकडून आंदोलनाची भूमिका तयार होत आहे. त्यानुसार उद्यापासून आंदोलन केलं जाणार आहे. नागपुरात उद्या संविधान चौकला आंदोलन केलं जाणार आहे.