रेल्वेचा प्रवास होणार फाटकमुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, इतके उड्डाणपूल उभारणार
फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महारेलची स्थापना करण्यात आली होती. महारेलच्या माध्यमातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे जाळे महाराष्ट्रभर बळकट करण्यात येणार आहे.
नागपूर : महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे ( महारेल ) अजनी येथील पुलासह विदर्भातील नवीन सहा रेल्वे उड्डाणपूलांचे भूमिपूजन आणि सहा उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. हे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महारेलची स्थापना करण्यात आली होती. महारेलच्या माध्यमातून रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे जाळे महाराष्ट्रभर बळकट करण्यात येणार आहे.
रेल्वे फाटकावर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुलभ आणि विनाअडथळा प्रवास व्हावा. यासाठी महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक सुलभ करणारे शंभर उड्डाणपूल येत्या वर्षभरात उभारले जाणार आहेत. आगामी पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बसस्थानके विमानतळाप्रमाणे होणार
महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात शंभर रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास हा फाटकमुक्त होईल. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील.
त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमास दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अजनी येथील 1927 मधील ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाचे आयुष्य संपले आहे. येथे जड वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे येथे नवीन पुलाची आवश्यकता होती. या पुलाचे आज भूमिपूजन झाले. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पुढील 14 महिन्यात पूर्ण करण्यात येईल.
अजनीत सहा पदरी पूल उभारणार
अजनी येथे सहा पदरी पूल उभारणार आहे. सध्याचा पूल काही दिवस तसाच राहील. त्याच्या बाजूला तीन पदरी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर जुना पूल तोडून तेथे उर्वरित तीन पदरी मार्गाचे काम सुरू करण्यात येइल. या पुलाची लांबी 220 मीटर आणि रुंदी 38 मी. राहणार आहे. त्याचा अंदाजित खर्च 332 कोटी आहे. या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल असेही ते म्हणाले.