‘तर ते देशाचे तुकडे-तुकडे करतील’, मोदींचा रामटेकमध्ये इंडिया आघाडीवर निशाणा
"भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष मिळून आपल्याजवळ आले आहेत. आपलं प्रत्येक मत महायुतीला जिंकवण्यासाठी आहेच पण विरोधकांना शिक्षा देण्यासाठीदेखील आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला मागे ठेवलं", असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.
महायुतीचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज रामटेकमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. “१९ एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही तर पुढच्या एक हजार वर्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचं आहे. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचं आहे. निवडणुकीबाबत मीडियाकडून सर्व्हे दाखवला जातोय. त्यात एनडीएचा बंपर विजय दाखवला जातोय. या सर्व्हेच्या मागे मीडियावाले इतका खर्च का करता? त्यांना पैसे वाचवण्याचा एक फॉर्म्युला देतो. मोदीला जेव्हा शिव्या वाढायला लागल्या तर समजा पुन्हा मोदी जिंकून येणार. जेव्हा विरोधक माझ्या आई-वडिलांबद्दल मला अपशब्द बोलतात तेव्हा समजून जायचं पुन्हा एकदा मोदी सरकार. ईव्हीएम प्रश्न उपस्थित झाले तेव्हा समजून जा पुन्हा एकदा मोदी सरकार”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“इंडिया आघाडीवाले एक खोटं पसरवत आहेत की, मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल. मी जेव्हा राजकारणात आलो आहे तेव्हापासून अशी कोणतीही निवडणूक राहिलेली नाही ज्यामध्ये विरोधकांनी अशी भाकडकथा ऐकवलेली नाही. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बनलं तेव्हाही ते असेच गीत गात होते. याचा अर्थ यांच्याकडे नवी कल्पनाही नाही. आणीबाणीच्या वेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती. चारही दिशेला तेच नजर येत होते. तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती?”, असा सवाल नरेंद्र मोदींनी केला.
‘गरिबाच्या मुलावर या लोकांनी…’
“एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसत आहे. इंडिया आघाडीवाले कधीही गरिबांना पुढे जाताना बघू शकत नाहीत. मराठीत एक म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. पाण्यात कितीही लाठी मारा. पाणीत भेद होणार नाही. गरिबाच्या मुलावर या लोकांनी कितीही हल्ला केला तरी मोदी देशाच्या संकल्पनांसाठी मागे हटणार नाही. इंडिया आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशाचं वाटप करायला लागले आहेत. त्यांना माहिती आहे की, देशातील सर्वजण एकजूट झाले तर त्यांचं राजकारण संपून जाईल. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या नागरिकांना आवाहन करु इच्छितो, एकजूट होऊन देशाच्या नावाने मतदान करा”, असं मोदींनी आवाहन केलं.
‘तर ते देशाचे तुकडे-तुकडे करतील’
“इंडिया आघाडी ताकदवान झाले तर देशाचे तुकडे-तुकडे करतील. ते आजही एका समाजाला दुसऱ्या समाजात लढवण्यासाठी कोणतीही कसर मागे सोडत नाहीत. आमचं रामटेक हे ते स्थान आहे जिथे स्वत: प्रभू श्रीरामांचे पाय लागले आहेत. यावेळी अयोध्येत आमचे रामलल्ला टेंटमध्ये नाही तर भव्य मंदिरात दर्शन देतील. 500 वर्षांनी हा क्षण येत आहे. रामटेकला, महाराष्ट्रला आणि देशाला अद्भूत आनंद होत आहे. पण प्राणप्रतिष्ठानच्या वेळी या लोकांनी निमंत्रण स्वीकारलं नाही. हे लोक हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करु इच्छित आहेत. अशा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एक तरी जिंकू द्याल? त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे की नाही? त्यांना मतदानातून शिक्षा देणार की नाही?”, असे सवाल मोदींनी केले.