पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेचा सराव, जिल्हा परिषदेचा पुन्हा एक नागपूर पॅटर्न
नागपूर जिल्ह्यात रविवारी पाचवी व आठवी वर्गाच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. दोन्ही वर्ग मिळून जवळपास 9 हजार विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली.
नागपूर : शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (Scholarship Exam) मुलांना यश मिळावे. तसेच या परीक्षेतील जिल्ह्याचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेने हा एक नागपूर पॅटर्न (Nagpur Pattern) राबविणे सुरू केले आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणे ही अट नव्हती. विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसो अथवा न बसो. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कळावे. तसेच याच धर्तीवर होणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांना यश द्यावे ही भूमिका यामागे ठेवण्यात आली होती. आयुष्यात शालेय शिक्षण हे जीवन घडवणारे असते. ग्रामीण भागातल्या गुणवंतांना जिल्हा परिषदेच्या शाळा आपले करिअर घडवणारे माध्यम. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी योगेश कुंभेजकर (Chief Executive Yogesh Kumbhejkar) यांनी या क्षेत्रात लक्ष घातले.
93 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
पाचव्या वर्गातील 7 हजार 687 तर आठव्या वर्गातील 1 हजार 898 विद्यार्थ्यांना रविवारी ही परीक्षा द्यायला लावली. पाचव्या वर्गातील 93 टक्के तर आठव्या वर्गातील 92 टक्के विद्यार्थ्यांची परिक्षेसाठी उपस्थिती होती. एकूण 13 तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.
स्पर्धा परीक्षेचा पाया
स्पर्धा परीक्षेचा ग्रामीण भागातला दीर्घकाळ पाया म्हणजे चौथी आणि सातवीत होणारी स्कॉलरशीप परीक्षा होती. शासनाने आता ही परीक्षा पाचवी आणि आठवींमध्ये घेणे सुरू केले आहे .या परीक्षेचा पॅटर्न हा स्पर्धा परीक्षांसारखा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी शालेय शिक्षणात स्पर्धा परीक्षेची गोडी लागते. भविष्यात त्याचा फायदा होतो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला गेल्या तीन महिन्यांपासून या परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरित केले होते.
यांनी केले विशेष प्रयत्न
ग्रामीण भागातील अनेक गुणवान शिक्षकांनी यासाठी मुलांना तयार केले आहे. खरी परीक्षा आणखी पुढे एप्रिलमध्ये आहे. मात्र त्यापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी. मुलांना या परीक्षेचे महत्त्व कळावे, या परीक्षेचे गांभीर्य कळावे यासाठी स्कॉलरशीपची सराव परीक्षा पूर्ण जिल्ह्यात घेतली गेली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रश्मी बर्वे, शिक्षण सभापती भारती पाटील यांच्या मार्गदर्शनात शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकर शिष्यवृत्ती समन्वयक भास्कर झोडे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहे.