Nagpur | महसूल अधिकाऱ्यांनी जलद सेवा द्याव्यात, जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांचे आवाहन
महसूल अधिकाऱ्यांनी जलद सेवा द्याव्यात असे आवाहन जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी केले. दोन दिवसीय विभागीय महसूल परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. महसूल विषयक कामकाजावर काल मंथन झाले.
नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक (Director of Land Records) निरंजन सुधांशू (Niranjan Sudhanshu) यांनी सांगितले. वनामती सभागृहात आयोजित महसूल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा ( Commissioner Prajakta Lavangare), नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यावेळी उपस्थित होते.
जमिनीच्या मोजणीसाठी रोव्हर मशीन
जमिनीच्या नोंदी, अभिलेख अचूक ठेवणे हे महसूल विभागाचे महत्वाचे काम आहे. इतर कामांमुळे याकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, असे श्री. सुधांशू यावेळी म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासकीय कामामध्ये अनेक चांगले बदल होत आहेत. लवकरच जमिनीच्या मोजणीसाठी रोव्हर मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत होणारी जमीन मोजणी अवघ्या काही मिनिटात पूर्ण करणे शक्य होईल. पीक कर्ज अथवा इतर कर्जासाठी आवश्यक महसूल विभागाशी संबंधित अभिलेख बँकांना ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. कोविडसारख्या असाधारण परिस्थितीमध्येही या विभागाने चांगले काम केले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या या विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी, तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर, जमीन महसूल विषयक कायदे आदी बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.
कमी कालावधीत चांगल्या सेवा मिळतील
राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या धर्तीवर विभागस्तरावर महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महसूल प्रशासनाशी संबंधित महत्वाच्या कायद्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कामकाज अधिकाधिक अचूक आणि गतिमान होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी कालावधीत चांगल्या सेवा मिळतील, असे महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.