सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी दंड थोपटले, थेट घरासमोर प्रहार स्टाईल आंदोलनाचा इशारा; कारण काय?
आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपाणी देऊ. नारळ देऊ.
नागपूर | 11 ऑगस्ट 2023 : मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दंड थोपाटले आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. थेट सचिन यांच्या घरासमोरच प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच सचिन यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून बच्चू कडू यांनी सचिन यांना 15 दिवसाचा अल्टिमेटमही दिला आहे.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते भारतरत्न आहेत आणि भारताचे अभिमान आहेत. त्यांनी या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
नारळपान आंदोलन
आम्ही सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करू शकतो. भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. आमचं आंदोलन नेहमी अनोखं असतं. यावेळीही तसेच असेल. आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपान देण्याचं आंदोलन करणार आहोत. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाईन गेमच हद्दपार करा, अशी विनंती सचिन यांना करू, असं बच्चू कडू म्हणाले.
गेमच बंद करा ना
ऑनलाईन गेमचा दुष्परिणाम तरुण पिढीवर होत आहे. चारपाच मुलं एकत्र येऊन हा गेम खेळत आहेत. पालकांमध्ये चिंता आणि रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, अशी चेतावणी दिली जाते खरी. पण चेतवणी द्यायचीच कशाला? हा गेमच बंद करा ना. बऱ्याच राज्यांनी ऑनलाईन गेम बंद केला आहे. आपल्या राज्यातही तो बंद झाला पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
15 दिवसांची मुदत देणार
राज्यात ऑनलाईन गेम बंद व्हावा म्हणून आम्ही सचिन यांच्या जाहिरातीला विरोध करत आहोत. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यामुळेच आमचा त्यांनी जाहिरात करण्यावर विरोध आहे. ते भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. सचिन यांनी जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत देऊ आणि त्यानंतर आम्ही आंदोलन करणार आहोत, असंही ते म्हणाले.