समृद्धी महामार्गाचं लोकार्पण संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण...
नागपूर : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचं आज उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज हे लोकार्पण पार पडलं. नागपूर ते मुंबई असा 701 कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
14 जिल्ह्यांना जोडणारा हा 701 कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग जितका अनोखा तितकीच त्याची नागपुरातली सुरुवात देखील जबरदस्त. तब्बल 18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या ‘समृद्धीचा माईल झिरो’ चौकातून हा सुसाट, समृद्धी महामार्ग सुरू होतो! 55 हजार कोटी महाकाय बजेट असणारा हा महामार्ग आज सर्वांसाठी खुला झाला आहे.
‘समृद्धीचा माईल झिरो’ हा राज्यातील सर्वात मोठा चौक समृद्धी महामार्गवरच आहे. नागपुरात जिथून समृद्धी महामार्ग सुरु होतो, तिथे हा ‘समृद्धीचा माईल झिरो’ चौक प्रवाशांचं या महामार्गावर स्वागतासाठी सज्ज आहे.18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या हा चौक. 70 हजार 684 चौरस मीटर क्षेत्रफळ या चौकाने व्यापलंय. 36 चौरस मीटरचं लॉन, रंगीबेरंगी झाडं अन् डोळ्यांना दिपवणारी रोषणाई… अशा अनेक वैशिष्ट्यांसह राज्यातील सगळ्यात मोठा चौक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो…