संजय राऊत यांनी शिंदे गटाचा बापच काढला; म्हणाले, शिवसेना भवन घेण्यासाठी एका…
त्यांचे बाप आले पाहिजे. त्यांचा एक बाप असेल तर येईल. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? ही बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. बाळासाहेबानी ही वास्तू उभी केली आहे.
नागपूर: मुंबई महापालिकेतील कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत केवळ टीका करूनच थांबले नाहीत तर त्यांनी शिंदे गटाचा थेट बापच काढला आहे. शिंदे गट एका बापाचे असतील तर शिवसेना भवनाकडे येतील, असं आव्हानच संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.
ते घुसखोरच आहेत. त्यांना स्वत:चं अस्तिव नाही. ते कुठेही घुसत असतात. हातात सत्ता आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा सत्तेमुळेच आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या, मग दाखवतो. काल शिवसैनिकांनी दाखवलं ना. काल शिवसैनिक गेले. त्यांनी दाखवून दिलं. गद्दारांची एक पद्धत आहेत. गद्दार कुठेही घुसतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत आहे. एकसंघ पक्ष आहे. सर्व नगरसेवक पालिकेत जातील. सर्व पक्ष कार्यालयांना सील महापालिका प्रशासनाने सील लावल्याचं कळलं. कोणत्या कायद्याने? नोटीस का नाही दिली?. ही मनमानी आहे. लोकशाहीचा खून प्रत्येक लहानमोठ्या मंदिरात पाडत आहात. या राज्यात लोकशाही आहे की नाही? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोरांची टोळी घुसते. ताबा घेतात. त्यानंतर पालिका प्रशासन टाळे ठोकतात हे कोणाच्या आदेशाने चालंल? याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. तुम्ही ठोकशाहीने काम करत असाल तर त्यात शिवसेनेचं प्रगतीपुस्तक चांगल्या मार्काचं आहे हे लक्षात घ्या.
ठोकशाहीच्या संदर्भात आमच्याशी स्पर्धा करू नका. आम्ही जीवावर उदार होऊ. शिवसैनिक गेल्यावर कशी पळापळ झाली हे पाहिलं सर्वांनी. मुंबईतील कार्यालय शिवसेनेच्या ताब्यात राहील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
मुख्यमंत्री काही सूत्रे हलवत असतील तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकावीत. एक दिवस भाजपवाले तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात घुसतील तर ते तुम्हाला कळणारही नाही. गद्दारांविषयी बोलूच नका. ते कुठेही घुसतात.
मी वैयक्तिक आरोप करत नाही. हेच नरेश म्हस्के शिंदेंना आवरा म्हणून रोज मातोश्रीवर येत होते. हेच नरेश म्हस्के ते काय सांगत आहेत? ज्यांना ज्यांना पदे दिली ते बेईमान आणि गद्दार होत असेल तर लोक वाटत पाहत आहेत, असंही ते म्हणाले.
त्यांचे बाप आले पाहिजे. त्यांचा एक बाप असेल तर येईल. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार? ही बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. बाळासाहेबानी ही वास्तू उभी केली आहे. ती आमची आहे. शिवसेनेच्या नावानेच ती राहील.
अशा घोषणा आणि वल्गना खूप होतात. तुमच्याकडे औटघटकेची सत्ता आहे. तुम्ही भाषा आवरा. नाही तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल. तुम्हाला वातावरण बिघडवायचं असेल तर आम्ही तयार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.