‘मधले पवार लटकले’, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांना डिवचलं
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. यावेळी आयोजित सभेत संजय राऊतांनीदेखील उपस्थिती लावली. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला.
नागपूर | 12 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. यावेळी नागपुरात सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. “ही मर्दांची सभा आहे. पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणू. मोठ्या पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी लहान पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आणि मधले पवार लटकले आहेत. त्यांना लटकू द्या. ते ज्या झाडावर लटकले आहेत त्यावरून ते खाली पडतील”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आले तेव्हा वाटलं की ते विजयाची हवा आणणार, ते विजयाची बातमी घेऊन येतील, असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही ते दुर्दैवी. पण मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तसं महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे जेलमधील माझे मित्र आहेत. हे दोन हाफ आणि एक फुलचं सरकार आहे. एक फूल आणि 2 डाऊटफूल लोकांचं सरकार आहे”, असे टोले राऊतांनी लगावले.
‘मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आणि शरद पवारांचा चेला’
“मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आणि शरद पवारांचा चेला आहे. याला म्हणतात डबल इंजिन. नरेंद्र मोदी यांना जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काढून टाकण्यात येत होतं तेव्हा बाळासाहेबांनी मध्यस्ती केली आणि त्यांना वाचवलं होतं. हा मर्दांचा महाराष्ट्र आहे. आमचा पक्ष फोडून काढता तर आम्ही तुम्हाला फोडून काढू. हा राज्य आणि देश फक्त लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो. जेव्हा कधी एक नेता चालायला लागतो तेव्हा परिवर्तन नक्की होतं”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवर भूमिका मांडली. 800 किमीचा प्रवास, 31 दिवसांचा कालावधी, 10 जिल्हे, 20 तालुके, 400 गावं आणि रोज कमीत कमी 25 किमीचा पायी प्रवास करत राज्यातील सामान्यांशी थेट संवाद साधण्याचं काम रोहित पवार यांनी केलं. भारताच्या इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी असा कार्यक्रम राबवला आहे. युवा संघर्ष यात्रेचा कार्यक्रम कशासाठी केला? तरुणांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, रोजगार, बेकारी समस्या मोठी आहे. सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्यासाठी ही यात्रा महत्त्वाची होती, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.