Science Fair | अपूर्व विज्ञान मेळावा : नागपुरातल्या छोट्या वैज्ञानिकांची मोठी गोष्ट!
अपूर्व विज्ञान मेळावा हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजविणारा तसेच त्यांना हसत खेळत विज्ञान शिकविणारा मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च बघावे, समजून घ्यावे, शिकावे व स्वत: करून पाहावे, या उद्देशाने या विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.
नागपूर : महापालिकेच्यावतीनं (Municipal Corporation) असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) यांच्या सहकार्यानं झाशी राणी चौक येथील राष्ट्रभाषा भवन येथे अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केलाय. शहरातील विविध खासगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक या मेळाव्याला भेट देत आहेत. विज्ञानाच्या विविध प्रयोगांविषयी माहिती जाणून घेत आहेत. विशेष म्हणजे अपूर्व विज्ञान मेळाव्यात (Science Fair) सर्व प्रयोग सहज उपलब्ध होतील अशा वास्तूंपासून करून दाखविण्यात येत आहेत.
बघावे, समजून घ्यावे आणि शिकावे
अपूर्व विज्ञान मेळावा हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजविणारा तसेच त्यांना हसत खेळत विज्ञान शिकविणारा मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च बघावे, समजून घ्यावे, शिकावे व स्वत: करून पाहावे, या उद्देशाने या विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील जवळपास शंभर प्रयोग करून दाखविण्यात येत आहेत. या विज्ञान मेळाव्याला शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळांमधील विद्यार्थी भेट देत आहेत.
दोनशे वैज्ञानिकांचा सहभाग
या अपूर्व विज्ञान मेळाव्यात नागपूर महापालिकेच्या वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, दत्तात्रयनगर माध्यमिक शाळा, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा, दुर्गानगर माध्यमिक शाळा, स्व. साखरे गुरुजी प्राथमिक शाळा, विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, लाल बहादूर शास्त्री शाळा, संजयनगर माध्यमिक शाळा, एमएके आजाद उर्दू माध्यमिक शाळा, ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळा आदी शाळांमधील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या गजला अन्सारी या विद्यार्थिनीने लहान तोंडाची बरणी मोठा फुगा कसा गिळतो या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच अन्य विद्यार्थ्यांनीसुद्धा विविध प्रयोगाच्या माध्यमांतून भेट देणाऱ्या विविध शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना विज्ञानाचे धडे दिले.
मेळावा 19 डिसेंबरपर्यंत 11 ते 4 या वेळात
अपूर्व विज्ञान मेळावा राष्ट्रभाषा भवनात 19 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहणार आहे. यात नागपूर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग करून दाखवले जात आहेत. तसेच देशभरातून आलेले प्रतिनिधीही विज्ञानातील बारकावे रंजक पद्धतीने समजावून सांगत आहेत. अपूर्व विज्ञान मेळावा मनपा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनोखी संधी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि संवाद कौशल्य विकसित होत आहे. समाजात विज्ञान शिक्षणाबद्दल जागरुकता सुद्धा वाढते. त्यामुळे शहरातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी या अपूर्व विज्ञान मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी केले आहे.
प्रत्यक्ष दाखवून अवयवांच्या कार्याची माहिती
यंदा अपूर्व विज्ञान मेळाव्यात आकर्षणाचा विषय म्हणजे येथे प्रत्यक्ष बकरीचे मेंदू, फुफ्फुस दाखवून या अवयवांबद्दल आणि त्यांच्या कार्याची माहिती श्री गुरु गोविंदसिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ज्यूनियर कॉलेजचे विद्यार्थी देत आहेत. यामध्ये तसमिया खान, सिमरन शर्मा, हिमाक्षी यादव या विद्यार्थिनींचा सहभाग आहे. यात अवयव दाखवून त्याची रचना, ते प्रत्यक्ष कार्य कसे करते याविषयी सखोल माहिती भेट देण्याऱ्या विद्यार्थ्यांना देत आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा शरीराच्या आतील महत्त्वाचे अवयव बघता यावे, या अवयवांबद्दल त्यांना विस्तृत माहिती मिळावी या उद्देशाने यंदा मेळाव्यात बकरीचे मेंदू आणि फुफ्फुस दाखवून त्यांच्याबद्दल माहिती देण्यात येत आहे.