Medical College | कोरोनाकाळात सेवा केली पण, मेवा मिळाला नाही; गोंदियातील डॉक्टरांच्या बाबतीत काय घडले?
या संदर्भात आरोग्य विभागाशी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच थकीत वेतन देण्यात येईल, अशी माहिती गोंदिया मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अपूर्वा पाडवे यांनी दिली.
गोंदिया : गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून वेतन नाही. त्यामुळं वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर साहाय्यता निधीचे देण्याचे होर्डिंग लावण्यात आले. कोरोना काळात सेवा देऊनही काय फायदा असा प्रश्न डॉक्टरांना पडला.
काम बंद करण्याचा दिला इशारा
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी 2021 मध्ये 24 सहायक प्राध्यापक आणि वर्ग 4 चे 260 कर्मचारी यांना चार-चार महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्यात आले. काही महिने नियमित वेतनदेखील यांना देण्यात आले. मात्र जुलै 2021 पासून या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. कोरोना काळात सेवा देऊनही पगार मिळत नाही. त्यामुळं डॉक्टर संघटनेनं वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठात्यांना पत्रव्यवहार केला. काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. तर पत्रव्यवहार करूनही डीन याकडे लक्ष देत नसल्याने डॉक्टर आणि प्राध्यापकांनी रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी निदर्शने केल्याचं कंत्राटी डॉक्टर मन्नू शर्मा व सहायक प्राध्यपिका डॉ. स्वाती यांनी सांगितले.
थकीत वेतन लवकरच दिले जाईल
या संदर्भात गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. अपूर्वा पाडवे यांना विचारणा केली असता हा विषय गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यातही आहे. या संदर्भात आरोग्य विभागाशी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच थकीत वेतन देण्यात येईल, अशी माहिती गोंदिया मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अपूर्वा पाडवे यांनी दिली.
राज्यातील थकीत पेमेंट शंभर कोटी
या डॉक्टरांनी कोरोना काळात रुग्णालयात सेवा दिली. मात्र सेवा देऊनही पगार मिळत नसेल तर काम का करावा असा प्रश्न येथील डॉक्टरांना पडला आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता जवळपास पावणेपाच कोटी रुपयांचे वेतन थकीत असल्याची माहिती समोर आली. संपूर्ण राज्याचा विचार केला असता 100 कोटीच्यावर हे पेमेंट थकीत आहेत. त्यामुळं कोरोना अजून देशातून हद्दपार झाला नसताना पुनः ओमिक्रॉन विषाणूनं आपला प्रकोप वाढविला असताना हे डॉक्टर पुन्हा आपला कंत्राट वाढवून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं लवकरच पगाराचा तिढा सुटला नाही तर डॉक्टर, सहायक प्राध्यापक, कर्मचारी अधिकारी सेवेतून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही.