Sharad Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार का?; शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान काय?
शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी केस आहे सुरू आहे. माझ्याविरोधात सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात जाण्यापर्यंत अजितदादा गटाची मजल गेली आहे. तरीही काही लोक राष्ट्रवादीच्या फुटीच्या खेळी मागे आमचा सहभाग आहे असं म्हणतात. त्यांनी काही मर्यादा ठेवल्या पाहिजे.
अकोला | 12 ऑक्टोबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे मंत्रीही अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचं उघड भाष्य करत आहेत. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर बहीण म्हणून पहिला हार मी घालेल असं बिनधास्त सांगून टाकलं. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक विधान केलं आहे. ते अकोल्यात मीडियाशी संवाद साधत होते.
अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर, अजितदादा मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे. ही न घडणारी गोष्ट आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच अजित पवार यांना निवडणुकीत स्वीकारायचं की नाही हे लोकच ठरवतील, असंही शरद पवार यांनी स्पेष्ट केलं.
तो भुजबळांचा प्रस्ताव होता
भाजपसोबत जाण्याचा काही लोकांचा आग्रह होता. ही गोष्ट खरी आहे. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा भुजबळांचा प्रस्ताव होता. आमचा तो प्रस्ताव नव्हताच. पण तो स्वीकारला नाही. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढची जी स्टेप होती ती मान्य नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. भुजबळ यांनीच आपण खोटं बोलून शपथविधीला गेल्याचं कबुल केल्याचंही त्यांनी सांगितलं.
आणखी काही पक्ष सोबत येणार
आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. या सर्वांचं राज्य यावं यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे. जनमाणसात प्रतिसाद मिळत आहे. मतात परिवर्तन झालं तर आमची सत्ता येईल. आमच्या आघाडीत काही पक्ष येतील. शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्षही येतील, असं सांगतानाच शरद पवार यांनी वंचित आघाडीच्या समावेशावर बोलणं टाळलं.
आंबेडकरांना प्रत्युत्तर
शरद पवार अदानी सोबत असतात आणि राहुल गांधी अदानीला विरोध करतात. इंडिया आघाडीतच अदानींवरून मतभेद असल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. गुजरातमध्ये एका शेतकऱ्याने डेअरी टाकली. दूधापासून नवीन औषध करण्याचा हा कारखाना होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्या कार्यक्रमाला अदानींनाही बोलावलं होतं. एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि वेगवेगळ्या विचाराचे लोक जमले तर ती राजकीय भूमिका असत नाही, असं पवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले…
भाजप राज्यात नाही, पण देशात येईल असा लोकांचा समज आहे. 70 टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. याचा लोकसभेत काही ना काही परिणाम होईल असं वाटत.
ईव्हीएमबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मध्यप्रदेशचे नेते दिग्विजय सिंह यांनी त्यावर अभ्यास केला आहे. दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निर्णय आला नाही.
मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची जबाबदारी आमची नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांची आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण सोडताना ज्यांनी त्यांना शब्द दिला ते काय करतात ते पाहू.
तुम्ही देशाचं चित्र पाहा. ते चित्र भाजपच्या विरोधी आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगना, राजस्थान, झारखंड, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल या ठिकाणी भाजपची सत्ता नाही. गोव्यात सरकार नव्हतं. फोडाफोडी करून तिथे सत्ता आणली. महाराष्ट्रातही तेच केलं. मध्यप्रदेशात भाजपचं राज्य नव्हतं. तिथे कमलनाथ मुख्यमंत्री होते. फक्त यूपीत त्यांची सत्ता आहे. 70 टक्के राज्यात भाजप नाही. ही राज्यांची स्थिती आहे. ही स्थिती कायम राहील असं वाटतं.