उद्धव ठाकरे यांना धक्यावर धक्के, शिंदे गटाच्या खासदाराने सांगितला धोका, आता आणखी पुढे काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. या दरम्यान शिंदे गटाच्या एका खासदाराने मोठा दावा केलाय.
नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता ठाकरे गटातील दोन खासदारही शिंदे गटात येतील, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केलाय. याशिवाय ठाकरे गटाकडे असलेले 10 आमदार सुद्धा आमच्याकडे येतील, असं वक्तव्यदेखील त्यांनी केलंय. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेमके कोणते आमदार-खासदार शिंदे गटात जातील यांची नावं मात्र त्यांनी सांगितलेली नाही. पण त्यांनी केलेला दावा हा ठाकरे गटासाठी धक्कादायकच आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. पण तरीही त्यांनी कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला दिला आहे. आपण निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच खचू नका, आता वेळ संघर्षाची आहे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. दुसरीकडे ठाकरे गटातील आमदार-खासदार आपल्या पक्षात येतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय.
खासदार कृपाल तुमाने नेमकं काय म्हणाले?
“त्यांच्याकडे असलेल्या 16 आमदारांपैकी आणखी 10 आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात येतील. तसेच विदर्भातील माजी आमदार आले होते. आता उरलेसुरले सर्व पदाधिकारी आणि आमदार आमच्या शिवसेनेत येतील. धनुष्यबाण चिन्ह आपलं आहे. बाळासाहेबांची परंपरा जोपसण्याचं काम आम्ही करतोय. ते काम आम्ही करत राहू”, असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय.
शिंदे गट व्हीपच्या मुद्द्यावरुन आमदारांना घेरणार?
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिंदे गटाचा प्लॅन समोर आलाय. शिंदे गट व्हीप बजावून ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार आहेत. शिवसेनेचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे.
पुण्यात शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे-ठाकरे गटाचा वाद हा गेल्या आठ महिन्यांपासून सुरु आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावं, असं वेळोवेळी त्यांच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलंय. पण आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसतोय. त्यातूनच पुण्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून परिस्थिती हाताळली गेली. सुरुवातीला वाद मेटवणं पोलिसांना शक्य होत नव्हतं. पण नंतर वाद निवळण्यात पोलिसांना यश आलं.