नागपूर : विदर्भात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे बडे नेते तथा विदर्भाचे सहसंपर्कप्रमुख शेखर सावरबांधे (Shekhar Sawarbandhe) यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जातीय पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय, असा आरोप करत त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
दोन महिन्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता शेखर सावरबांधे यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार पडलं आहे.
शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जातीय, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय. मी जवळपास 20 वर्षे शिवसेनेत राहिलो. पण आता पक्षाचं चित्र पाहता सेनेत राहणं शक्य नाही, असे आरोप करत त्यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत.
शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती. परंतु “आपले नेते खा. गजानन किर्तीकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?”, असा सवाल उपस्थित करुन त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या निर्णयाने सेनेला मोठा धक्का बसलेला आहे.
विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे. शिवसेना पक्षनेतृत्व विदर्भात जास्त लक्ष देत नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा सातत्याने आरोप असतो. आता नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशातच सावरबांधे यांच्या धक्कातंत्राने शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत
शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती
विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती
हे ही वाचा :
Ashish Jaiswal | बाहरेच्यांना मंत्रिपद मिळतं, 30 वर्ष सेनेत पण सन्मान नाही मिळाला, फार दु:ख होतं
काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज