Omicron | नागपूरची चिंता वाढली! अजूनही 30 टक्के लोक दुसऱ्या डोसपासून वंचित; ओमिक्रॉनचा सामना करणार कसा?
नागपुरात 30 टक्के नागरिक लसीच्या दुसऱ्या डोजपासून वंचित आहेत. दुसरा डोज घेतला नाही, मग ओमिक्रॅानचा सामान कसा करणार? 100 टक्के लसीकरणासाठी नागपूर मनपाचे प्रयत्न सुरू असल्याचं मनपा आयुक्त सांगतात. पण, लस न घेतल्यांमुळं इतरांचं टेन्शन वाढलं.
नागपूर : नागपुरात 30 टक्के पात्र नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोज न घेतल्यामुळं इतरांचं टेन्शन वाढलंय. नागपुरात कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकलीय. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 441 नवे रुग्ण आढळून आलेत. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोरोना लस हे महत्त्वाचं हत्यार आहे. पण नागपुरात आतापर्यंत पात्र नागरिकांपैकी 30 टक्के जणांनी लसीचा दुसरा डोज घेतला नाही. त्यामुळं नागपूरकरांची चिंता आणखीच वाढलीय.
30 जणांना ओमिक्रॅानची लागण
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारवर गेलीय. आतापर्यंत 30 जणांना ओमिक्रॅानची लागण झालीय. कोरोना वेगाने वाढत असताना, लसीचा दुसरा डोज न घेतलेल्या 30 टक्के लोकांनी आणखी टेन्शन वाढलंय. या नागरिकांना शोधून त्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न नागपूर मनपा प्रशासन युद्ध पातळीवर करत असल्याचं मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांच म्हणणंय.
मंगल कार्यालयाला 25 हजारांचा दंड
आता लग्नसमारंभात 50 लोकांच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानंतर नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी देखील यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. गोरा कुंभार चौकात व्यंकटेशनगर येथे कारवाई करण्यात आली. शुभ आशीष लॉनवर यासंदर्भात कारवाई करण्यात आली. पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
मनपा कर्मचारी, पोलीस करणार पाहणी
मंगल कार्यालय, लॉन मालकांना त्यांच्याकडलील आयोजनाची माहिती मनपाच्या संबंधित झोन कार्यालयाला देणे अनिवार्य असेल. तसेच आगाऊ बुकिंगचीदेखील माहिती सादर करावी लागेल. समारंभाच्या दिवशी मनपा कर्मचारी, सबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आकस्मिक भेट देऊन पाहाणी करतील. नियमांचे उल्लंघन दिसून आल्यास व्यवस्थापक, आयोजक कारवाईस पात्र असेल. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास 25 हजार रुपये दंड तर वारंवार असेच दिसून आल्यास सभागृह, मंगल कार्यालय अथवा लॉन सील करण्यात येईल. शिवाय, गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे.
रूमाल म्हणजे मास्क नव्हे
समारंभ ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे. मास्क योग्य पद्धतीने अर्थात नाक व तोंड नेहमी झाकलेले असतील, असेच घालावे. रूमालाला मास्क समजले जाणार नाही. अशी व्यक्ती कारवाईस पात्र ठरतील. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी परवानगी असेल. तसेच, सभागृहाच्या मालकांना समारंभात सॅनिटायझर, साबण, पाणी तसेच तापमापकासह अन्य गोष्टी उपलब्ध करून द्यावा लागतील, असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.