Nagpur Crime | जीवन नकोसे झाले! विष घेऊन गळफास; 20 दिवस व्हेंटिलेटवर तरीही तुटली नाही आयुष्याची दोरी
खरं तर विष त्याच्या फुफ्फुसापर्यंत पोहचले होते. गळफासामुळं त्याला श्वासही घेता येत नव्हते. तरीही नशीब चांगले असल्यानं तो बचावला.
नागपूर : देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात. याचा प्रत्यय नरखेड ( Narkhed) तालुक्यातील एका शेतकऱ्याला आला. देवराव (नाव बदललेले) हा 35 वर्षांचा शेतकरी. पत्नी व वडीलांसोबत एका खेडेगावात राहतो. दोन चिमुकली मुले आहेत. एकरभर शेतीत कसे जीवन काढावे काही समजत नव्हते. घरातील गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात गेला.
घरावरची कवेलू उतरवून वडील शिरले घरात
पाच डिसेंबरची गोष्ट. जीवन नकोसे झाल्यानं त्यानं शेतावर जाऊन विष (Poison) प्राशन केले. त्यानंतर घरी आला. पाळण्यातील दोन महिन्यांच्या बाळाचे लाड केले. घरी एका खोलीत शिरला. आतून कुलूप लावले. विष अंगात भिनत असताना छताला दोरी बांधून गळफास लावला. ही बाब पत्नीच्या लक्षात आली. तिने पती गळफास असलेल्या अवस्थेत आचके देत होता. देवरावचे वडील घरावर चढले. कवेलू बाजूला करून आत उडी घेतली. मुलाला गळफासातून बाहेर काढले. तोपर्यंत देवराव बेशुद्ध झाला होता.
20 दिवस व्हेंटिलेटरवर
देवरावला अत्यंत गंभीर अवस्थेत नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात भरती केले. देवराव 20 दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत होता. तशी त्याची वाचणयाची शक्यता कमी होती. याची माहिती डॉक्टरांनी घरच्यांना दिली होती. पण, दैव बलवत्तर. कुटुंबीयांचे प्रयत्न आणि डॉक्टरांचे उपचार यामुळं त्याला नव्याने जीवन मिळाले. खरं तर विष त्याच्या फुफ्फुसापर्यंत पोहचले होते. गळफासामुळं त्याला श्वासही घेता येत नव्हते. तरीही नशीब चांगले असल्यानं तो बचावला.