VIDEO : असं दृश्य कधी पाहिलंय का? मंदिराच्या छतावर वाघ आणि खाली भाविक… डरकाळी ऐकून काळजात धस्स…
चंद्रपुरात एक थरारक दृश्य पाहायला मिळालं आहे. येथील एका मंदिरात भाविक पूजा करत असतानाच मंदिराच्या छतावर वाघ येऊन उभा राहिला. त्यामुळे सर्वांचाच थरकाप उडाला. अनेकांची घाबरगुंडी उडाली. काळजात धस्स झालं. पुढे काय झालं?
निलेश डाहाट, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, चंद्रपूर | 5 ऑक्टोबर 2023 : तुमच्यासमोर मृत्यू उभा असेल तर तुम्ही काय कराल? आणि यमदूताच्या रुपात जर वाघच तुमच्यासमोर येऊन उभा ठाकला तर? आधी तुमच्या काळजात धस्स होईल ना? तुमचे पाय लटपटतील ना? घाबरून गाळण उडेल ना? चंद्रपुरातही असा प्रसंग काही भाविकांवर ओढवला. त्यामुळे त्यांची बोबडीच वळली. हातपाय लटपटू लागले. अंगाचा थरकाप उडाला. आता मरणारच या भीतीने हे भाविक हादरून गेले होते. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. तुम्ही व्हिडीओ पाहाल तर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या ताडोबा बफर भागात निमढेला गावातील हा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. निमढेला येथील विठ्ठल- रूखमाई मंदिराच्या छतावर वाघ आणि खाली भाविकांची गर्दी असे दृश्य या व्हिडीओत दिसत आहे. हा वाघ छतावर बराचवेळ थांबला होता. काही वेळातच छोटा मटका नावाचा हा वाघ जंगलात दिसेनासा झाला. मात्र तोवर भाविकांनी श्वास रोखून धरला होता. बंडा अरविंद नावाच्या वन्यजीवप्रेमीने टिपलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर आता चांगलाच व्हायरल होत आहे.
वाघांचं वास्तव्य
चंद्रपूर जिल्ह्यात 1 ऑक्टोबर पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर पर्यटन खुले झाले आहे. मात्र बफर भागातही वाघांचे मोठे वास्तव्य आहे. छोटा मटका नावाचा वाघाचा बछडाही या परिसरात वास्तव्याला आहे. याच बफर भागात चिमूर तालुक्यातील निमढेला बफरक्षेत्रात रामदेगी येथे विठ्ठल- रुक्माई मंदिर आहे.
या मंदिरात रोज भाविक येतात. पूजा अर्चा करतात. मंदिरात थांबून गप्पा मारतात आणि निघून जातात. पण त्यांना आज एका भलत्याच प्रसंगाला सामोरे जावं लागलं. कधी स्वप्नातही असा प्रसंग आपल्यावर ओढवेल असं त्यांना वाटलं नव्हतं. या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र कधीही वाघ- मानव संघर्ष बघायला मिळालेला नाही.
वाघ येताच आरती थांबली
या विठ्ठल-रुखमाई मंदिराच्या छतावर अचानक एक भला मोठा वाघ आला. या पत्र्याच्या छताखाली म्हणजे मंदिरात भाविक होते. त्यात काही महिला आणि मुलीही होत्या. भाविक खाली आरती करत होते. वर वाघ होता. वाघ छतावर आल्याचं कळताच भाविकांनी आरती थांबवली. सर्वजण स्थिर चित्ताने छताखालीच उभे राहिले. काहींची गाळण उडाली. काहींच्या काळजाचा ठोका चुकला. आता काय होणार? अशी भीती सर्वांच्याच मनात घर करून गेली.
अन् वाघ दिसेनासा झाला
काही वेळ हा मटका नावाचा वाघ छतावर ऐटीत उभा होता. इकडे तिकडे पाहत होता. थोड्यावेळाने तो छतावरून उतरला आणि जंगलाच्या दिशेने जायला निघाला. छताच्या खाली असलेल्या भाविकांना हा वाघ आपल्यासमोरून ऐटीत चालताना दिसला. पण कुणी हूँ की चूँ केलं नाही. कुणाच्याही तोंडून शब्द फुटले नाहीत. जर त्यांनी आवाज केला असता तर त्यांची खैरच नव्हती. उलट वाघ खाली येताच भाविक थोडे आडोश्याला गेले. वाघानेही भाविकांकडे पाहिलं नाही. तो आपल्या मार्गाने निघून गेला. वाघ दिसेनासा झाला. त्यामुळे भाविकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.