Nagpur Crime | दारुड्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, रॉकेल ओतून लावली आग, प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
सक्करदरा पोलीस ठाण्यात एका दारुड्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याने स्वतःला लावलेली आग विझवली. त्यामुळं गुंडाचा जीव वाचला. जप्त केलेला मोबाईल परत मिळावा, यासाठी तो पोलिसांना धमकावत होता.
नागपूर : ही घटना आहे सक्करदरा पोलीस (Sakkarada Police) ठाण्यातली. सराईतील गुन्हेगार ठाण्यात दारूच्या नशेत पोहोचला. त्याने पूर्वीच अंगावर रॉकेल ओतले होते. पोलिसांच्या समोरच त्याने स्वतःला पेटवून घेतले. ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच आग विझवली. हा थरार गुरुवारी रात्री घडला. भांडे प्लॉटजवळ राहणारा सोनू राजकुमार दांडेकर ( वय 32) (Sonu Dandekar) असं या आरोपीचं नाव आहे. सोनू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 14 प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा गुन्हेगार सक्करदरा ठाण्यात गेला. तिथं पोलिसांना मोबाईलची (Mobile ) मागणी केली. रॉकेल आधीच अंगावर ओतले होते. कपड्यांना आग लावली. आधीचं कपड्यांवर रॉकेल असल्याने आगीने पेट घेतला. पोलिसांनी लगेच ही आग नियंत्रणात आणली.
नेमकं काय घडलं होतं
होळीच्या दोन दिवसांपूर्वी सोनूने शस्त्र दाखवून काही जणांन लुटलं. त्यामुळं पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचा मोबाईलही जप्त केला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर तो त्याचा मोबाईल परत मागायला पोलिसांकडं आला. पोलीस ठाण्यात सोनूनं गोंधळ घातला. जप्त केलेला मोबाईल परत देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. असं सोनूला पोलिसांनी सांगितलं. पण,तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांना धमकी देत त्याने स्वताला पेटवून घेतले.
रॉकेलचा वास आल्याने पोलीस दक्ष
सोनू हा सराईत गुन्हेगार आहे, याची पोलिसांना जाणीव होती. मद्यप्राशन केल्यानं तो कुणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शिवाय त्याच्या शरीरावर टाकलेल्या रॉकेलची वास येत होती. त्यामुळं पोलीस सतर्क झाले होते. हा सराईत गुन्हेगार असल्यानं कोणत्याही स्थराला जाऊ शकतो, याची पोलिसांना जाणीव होती. त्यामुळं ते सोनूवर लक्ष ठेऊन होते. अशातच त्याने स्वतःला पेटवून घेतले. लगेच पोलिसांनी ही आग विझवली. त्यामुळं त्याला फारस काही झालं नाही.