Nagpur एड्समुक्तीसाठी काम करणाऱ्या स्वयंसिद्धा, गर्भधारणेपासून बाळ होईपर्यंत घेतात काळजी
एचआयव्हीग्रस्त जोडप्याचा विवाह लावणे. त्यांना होणारे बाळ एचआयव्ही संसर्गमुक्त व्हावे, यासाठी गर्भवती मातेच्या घरी भेट देणे. बाळ होईपर्यंत त्यांची काळजी घेण्याचे काम या समुपदेशकांनी केले.
नागपूर : एड्स झाल्यास त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो. परंतु, त्यांच्यासाठी झटणारे काही मोजके लोकं असतात. एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून एड्समुक्तीचं काम केलं जातं. आज आपण, अशाच काही स्वयंसिद्धा असणाऱ्या महिलांना भेटणार आहोत.
एड्समुक्तीसाठी केला जातो प्रयत्न
केवळ स्पर्शातून एचआयव्ही पसरत नाही. तरीही एचआयव्हीबाधितांना समाज दूर ठेवतो. अशावेळी समुपदेशनाचे काम महत्त्वाचे ठरते. समुपदेशन करताना अनेकवेळा वाईट अनुभव येतात. परंतु, चांगले करण्याचा ध्यास घेतला जातो. वाईट अनुभव तिथेच टाकून एड्समुक्त कसे होईल, यासाठी प्रयत्न केला जातो, असे मत जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी तनुजा शेवारे यांनी व्यक्त केले.
या आहेत त्या विरांगणा
एचआयव्ही ग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद पेरणाऱ्या काही भगिनी कार्यरत आहेत. जिल्हा एड्स नियंत्रण संस्था एचआयव्ही नियंत्रणासाठी काम करते. या संस्थेत भावना जांभूळकर, लता पॉल, शुभांगी वालदे, ईस्टर वासनिककर, स्वाती वडेट्टीवार, माधुरी जेनेकर, निशा ढोक विजया मेश्राम, श्वेता वहाणे या काम करतात.
बाळ निरोगी होईपर्यंत घेतली जाते काळजी
एचआयव्हीग्रस्त जोडप्याचा विवाह लावणे. त्यांना होणारे बाळ एचआयव्ही संसर्गमुक्त व्हावे, यासाठी गर्भवती मातेच्या घरी भेट देणे. बाळ होईपर्यंत त्यांची काळजी घेण्याचे काम या समुपदेशकांनी केले. गुप्तरोग क्लिनिकमध्ये लैंगिक व प्रजनन मार्गाने होणारा संसर्ग थांबविला जातो. मातेपासून बाळाला एचआयव्हीचे होणारे संक्रमण थांबवण्यासाठी हे काम करतात. एचआयव्ही बाधित मातापित्यांच्या वेदनांवर फुंकर घातली जाते.
लॉकडाऊनमध्येही पालथ्या घातल्या वस्त्या
लॉकडाउनच्या कठीण काळात एचआयव्हीबाधित मातेच्या घरी जाणे तसे जिकरीचे काम होते. ही कामे या समुपदेशकांनी केली. एचआयव्ही बाधितांच्या पोटी जन्माला येणारे बाळ एचआयव्ही बाधित जन्माला येऊ नये, यासाठी ही सारी धडपड होती. नव्या जगात येणाऱ्या बाळाचे जगणे सुंदर करण्यासाठी या समुपदेशक महिलांनी प्रयत्न केले. झोपडपट्टीपासून तर शेकडो वस्त्या पालथ्या घालताना अनेकदा कटू अनुभव आला. त्यानंतरही आस्थेने विचारपूस करणाऱ्या या स्वंयसिद्धा कामाला लागल्या.
एचआयव्हीची बाधा झाली म्हणजे सारे काही संपले असा समज असतो. पण, अशा व्यक्तींना जगण्याचे बळ देणे आवश्यक असते. एड्सग्रस्तांना खरं तर मानसिक आधार हवा असतो. या रोगाविषयी समाजात गैरसमज आहेत. त्यामुळं अशा रुग्णांच्या मदतीला सहसा कुणी पुढे येत नाही.