Rain | पावसाळी आपात्कालीन परिस्थितीत घ्या काळजी, वीज पडण्याचा धोका असल्यास नेमकं काय कराल?
जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढावा.
नागपूर : पावसाळ्यात निर्माण होणा-या आपात्कालीन प्रसंगांचा सामना करण्यासाठी नागपूर महापालिकेची यंत्रणा नागरिकांच्या सुविधेसाठी सज्ज झाली आहे. मात्र नागरिकांनीही (Citizens) नैसर्गिक आपात्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. पूर किंवा वज्राघात अर्थात वीज पडणे अशा परिस्थितीत बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उपाययोजना जारी केल्यात. वीज पडण्याबाबत काही संभ्रम किंवा भ्रामक कल्पना आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे. वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. परंतु, काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत. मोठी बांधकामे (Construction) छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणा-या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 कि.मी.पर्यंत). वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. वज्राघात बाधीत किंवा जखमी व्यक्तीस आपण मदत करू शकतो. त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह (Electricity) सुरु नसतो. या व्यक्तीला तात्काळ मदत करावी.
वादळ वाऱ्यापासून बचावासाठी काय करावे?
गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणा-या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रिया पुढे ढकलावी. विजेवर चालणाल्या वस्तू, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवावी. आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे. घरात असल्यास : घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर रहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणी वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातूपासून तयार झालेली वाहने (बस मोटार) चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे.
वीज पडल्यास काय करालं?
त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या थंड परीस्थितीत, बाधित व्यक्ती व जमिनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल. इजा झालेल्या इसमास असे हाताळा. श्वसन बंद असल्यास : तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास : कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR करुन सुरु ठेवा.