‘मुलीचा मृतदेह तरी ताब्यात द्या..’,नागपूर स्फोटानंतर कुटुंबियांचा टाहो
या स्फोटामुळे फॅक्ट्रीच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत मृतांच्या वारसदारांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या कारखान्यात सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या कारखान्यात सैन्यासाठी ड्रोन आणि विस्फोटकं तयार केली जातात
नागपूर | 17 डिसेंबर 2023 : नागपूरातील सोलर इंडस्ट्रीज इंडीया लिमिटेड कंपनीत रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यास प्रचंड उशीर लागला आहे. त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांना आणि नातेवाईकांना कंपनीजवळी महामार्गावर रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी अखेर परिस्थिती हातळून अखेर नियंत्रणात आणली. सकाळी नऊ वाजता स्फोट झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम संपले नव्हते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करीत वारसांना पाच लाखांची नुकसान भरपाई करण्याची घोषणा केली आहे.
नागपूर जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी दूरवर असलेल्या सोलर इंडस्ट्रीज फॅक्ट्रीच्या प्रवेशद्वारावर अनेक एम्ब्युलन्स तैनात केल्या आहेत. सकाळी स्फोट होऊन लागलेल्या आगीत 9 जण ठार तर तीन जखमी झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी आणि मृतांच्या नातलंगासह 200 लोकांनी येथे रस्तारोको केला. त्यामुळे स्थिती तणावपूर्वक बनली होती. त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवले.
मुलीच्या मृत्यूने पित्याचा आधार गेला
नागपूरच्या जवळील स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात नीळकंठराव सहारे यांची लेक बळी गेली. नीळकंठ आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात मिळविण्यासाठी हताशपणे फॅक्टरीच्या बाहेर येरझऱ्या घालत आहेत. त्यांची मुलगी आरती ( 22 ) हीचा त्या नऊ मृतांमध्ये समावेश आहे. ती त्यांच्या कुटुंबातीस एकमेव कमावती सदस्य होती. आरतीचे वडील नीळकंठ यांनी लकवा मारलेला आहे. त्यामुळे त्यांना लंगडत चालावे लागते. आरतीची आई बोलू शकत नाही. आरतीची बहिण लहान असल्याने हे कुटुंब उद्धवस्त झाले आहे.
दोन मुलांची आई रुमिताचाही मृत्यू
या भयानक दुर्घटनेत 32 वर्षीय रुमिता उइके यांचेही प्राण गेले. तिचे वडील देवीदास इरपती यांना अन्य लोकांनी या दुर्घटनेची माहीती दिली. येथून जवळच्या खैरी वस्तीत रहाणाऱ्या रुमिला हिला रविवारी धामनगावला तिच्या माहेरी जायचे होते. रुमिला हीला दोन मुले आहेत. तिचे पती शेत मजूर आहेत. आम्हाला माहीती नाही तिचा मृतदेह केव्हा मिळेल असे देवीदास यांनी सांगितले.
पोलिसांचे म्हणणे
या कारखान्यात स्फोटके तयार करण्यात येत असल्याने त्यांची सुरक्षित हाताळली करण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलावले आहे. या प्रक्रियेला वेळ लागल्याने मृतदेह बाहेर काढायला वेळ लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मृतदेहांना ताब्यात देण्यास उशीर झाल्याने संतप्त रहीवाशांनी अमरावती – नागपूर रोडवर रस्तारोको केल्याचे पोलिसांनी सांगितले.