नागपूर शहरात आपली बसची चाके थांबली, पगार वाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हाल
नागपुरातील स्टार बस कर्मचाऱ्यांचा संप आजपासून सुरू झालाय. पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेलेत. शहरातील 250 पेक्षा जास्त बस ठप्प आहेत. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत
नागपूर : पगार न झाल्यानं चालक-वाहकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. आपली बसचा मुख्य डेपो मोरभवन ( Main Depot Morbhavan) येथे आहे. सर्व कर्मचारी एकत्र आले. पगार न मिळाल्यामुळं कामावर जाण्यास ते तयार नाहीत. त्यामुळं शहर परिवहनची (city transport) आपली बसची वाहतूक आता खोळंबली आहे. नेहमी दहा ते बारा तारखेपर्यंत पगार मिळत नाही. युनिटी सेक्युरिटी फोर्सला (unity security force) हे कंत्राट दिले आहे. बरेचदा पंधरा तारीख ओलांडून गेल्यावरही पगार मिळत नाही. नियम खूप कडक आहेत. मोबाईल वापरला जाऊ दिला जात नाही. घरी जायला उशीर होतो, असं महिला कर्मचारी सांगतात. पगार मिळतो. तोही फक्त आठ हजार. हे पैसेसुद्धा वेळेवर मिळत नाही. मुलांचे शिक्षण, इतर खर्च कसा भागवावा काही कळतं नाही, असा संतापही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय.
संपामुळे प्रवाशांचे हाल
आपली बसच्या कर्मचाऱ्यांना पगार दहा तारखेला मिळेल, असं लेखी देण्यात आलं आहे. परंतु, तेही मिळत नाहीत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कधी वीस तर कधी पंचेवीस तारखेला पगार होतो. कर्मचाऱ्यांनी आधीच कळविले होते की, पगार झाला नाही, तर आपली बस सुरू करणार नाही. त्यामुळं हा संप नियमानुसार असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय. पगार झाला नसल्यानं बस उभ्या करण्यात आल्या. या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत.
खासगी वाहनांची मनमानी
खासगी वाहनचालकांनी अतोनात भाव वाढविले आहे. त्यांना वाटेल, तसे भाव ते मागतात. सामान्य व्यक्तीला प्रवास करणे कठीण झाले आहे. आपली बस हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. पण, कर्मचारी संपावर गेल्यामुळं वाहतूक व्यवस्थेचा तीनतेरा वाजलेत. पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेलेत. शहरातील 250 पेक्षा जास्त बस ठप्प आहेत. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत.