जीवंत असताना वन्यप्राण्यांपासून जीवाला धोका, मृत्यू झाल्यास २५ लाख कोण्या कामाचे?
जीव गेल्यानंतर २५ लाख रुपये काय कामाचे असा प्रश्न जंगलाशेजारी राहणारे नागरिक विचारत आहेत.
नागपूर : वन्यप्राण्यांमुळे जंगलाशेजारील गावांतील लोकांना धोका असतो. जीव मुठीत घेऊन जगावे लागते. वन्यप्राणी नेहमी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाख रुपयाची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून २५ लाख रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे. अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाच लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. परंतु, जीव गेल्यानंतर २५ लाख रुपये काय कामाचे असा प्रश्न जंगलाशेजारी राहणारे नागरिक विचारत आहेत.
जंगलात गेल्यामुळेच ९० टक्के मृत्यू वाघाच्या हल्ल्यात होतात. त्यामुळे अकारण जंगलात फिरू नका आणि अवैध वृक्षतोडही करू नका, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांना केले. कारण जंगलाशेजारील नागरिकांना नेहमी वन्यप्राण्यांची भीती असते. काही गावांमध्ये गावाला लागून कोअर झोन तयार करण्यात आला आहे.
जंगलालगतच्या गावांना कुंपण
विधीमंडळ अधिवेशनात एक कायदा येणार आहे. या कायद्यानुसार वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. गरीब शेतकरी स्वतःच्या पैशातून कुंपण लावू शकत नाही. त्यामुळे जंगलालगत असणाऱ्या गावांच्या बाजूला दोन किलोमीटरवर कुंपण टाकून वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून रोखण्याचे नियोजन करता येईल का, यासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सोलर आणि तारेच्या कुंपणाचाही पर्याय उपलब्ध करून देत कुंपण खरेदीसाठी शेतकऱ्याच्या खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे. असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सोमनाथ ताडोबा सफारी गेटचा शुभारंभ करण्यात आला.