राज्यातील अभयारण्यातील पर्यटन दोन दिवसांत सुरू करणार; वनसचिवांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
राज्यातील अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. लेखी आश्वासन प्राप्त झाल्यामुळे टिपेश्वर अभयारण्य येथे सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात आले. अशी घोषणा शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष तसेच शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.
यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यासह राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्प येथील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी तसेच गाईड यांची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी अभयारण्याचे पर्यटन त्वरित सुरु करावे अशी आग्रही मागणी शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांचेकडे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने 31 जानेवारी टिपेश्वर अभयारण्याच्या (Tipeshwar Sanctuaries) गेटसमोर सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले. जीप्सी चालक, गाईड तसेच किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी थेट टिपेश्वर अभयारण्याच्या गेटसमोरच ठिय्या मांडून आंदोलनाला सुरुवात केली. आपल्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी आंदोलन करणा-यांनी घोषणाबाजी केली. काही अघटित घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
जीप्सी चालक, गाईडही होते आंदोलनात सहभागी
दरम्यान वनसचिव तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत झाली. चर्चेनंतर वनसचिव यांनी काही अटींच्या आधारावर दोन दिवसांत अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले. याव्यतिरिक्त पर्यटन सुरु करण्यात येणार असल्याचे पत्र सुध्दा पांढरकवडा डीएफओ यांनी दिले. त्यामुळं हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली. या आंदोलनात सुन्ना ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंचांसह अनेक जीप्सी चालक, गाईड सहभागी झाले होते.
इतर राज्यातील प्रकल्प का सुरू?
मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरू असताना ताडोबा, टिपेश्वर तसेच इतर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद का ? असा प्रश्न किशोर तिवारी यांनी सरकारला केला होता. राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला जातो. त्याचवेळी राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन का सुरु करण्यात येत नाही असा प्रश्न सुध्दा तिवारी यांनी उपस्थित केला होता. गेल्या दोन वर्षापासून टिपेश्वरचे अभयारण्य बंद, चालू करण्यात येत आहे. त्यामुळं जिप्सी चालक तसेच गाईड्स यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळेच न्यायासाठी हे आंदोलन करण्यात आले.