नागपूर: दिशा सालियनप्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं आहे. दिशा सालियन प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसोबत अचानक विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले आहेत. तर संजय राऊत आज मोठा गौप्यस्पोट करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या हालचालींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
अधिवेशनाला सर्वाना उपस्थित राहावे हे अपेक्षित आहे. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपुरात आले आहेत. संसदेचं अधिवेशन एक आठवडा स्थगित असल्यानं खासदार संजय राऊतही सोबत आले आहेत. द्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर हे सर्व एका विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दिली आहे.
शिवसेनेचे सर्व नेते नागपुरात दाखल झाले आहेत. आज सकाळी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. पण शिवसेनेचे सर्व नेते एकत्र आल्याने काहींनी धसका घेतला, असा चिमटा सचिन अहिर यांनी काढला.
मागच्या आठवड्यात आम्ही विरोधक म्हणून विदर्भाचे प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी आम्हाला विदर्भाच्या प्रश्नांवर बोलण्यापासून रोखले. आज या सर्व प्रश्नांची दखल घेतली जाणार आहे. आज सभागृहात 298 अंतर्गत विरोधी पक्ष नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदर्भाचा विषय मांडणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आज विधानसभेत विदर्भासह कर्नाटकाच्या प्रश्नावरही विरोधकांना धारेवर धरलं जाणार आहे. या सगळ्या प्रश्नांची चर्चा सभागृहात व्हावी एवढी अपेक्षा विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्याकडून असल्याचं त्यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले बॉम्ब फोडणार. काही विषय असतात. संजय राऊत बोलता तेव्हा ते काहींना काही हादरा देतात. आज कदाचित ते पत्रकारांशी संवाद साधतील, असंही त्यांनी सांगितलं.