BJP: उद्धव ठाकरेंकडून जे पी नड्डांच्या वक्तव्याचा विपर्यास, शिवसेना उद्धव स्वत:च संपवित आहेत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
आपल्या कुळाचा त्यांनी उल्लेख केला आहे. हा उल्लेख करून जर त्यांचे नैराश्य संपत असेल तर आपल्याला हरकत नाही. अशी प्रतिक्रिया कुळांच्या उद्धव यांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी दिली आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे उदाहरण त्यांनी दिले. पंतप्रधानांनी जनतेला हाक दिली आणि जनता त्याला प्रतिसाद देत आहे. हे अभियान भाजपा पूर्ण करत आहे, याकडे उद्धव ठाकरेंनी राजकीय दृष्टिकोनातून टीका केलेली आहे. त्यांची ही टीका योग्य नाही. त्यांनी अमृत महोत्सवाच्या अपमान केलेला आहे. असेही बावनकुळे म्हणाले.
नागपूर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करीत आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule)यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहे. राज्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर सरकार आले पाहिजे, त्यासाठी काम करण्याची गरज आहे, असा नड्डा ( J P Nadda) यांच्या बोलण्याचा अर्थ होता, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. जे पी नड्डा यांनी केलेल्या प्रादेशिक पक्ष संपतील या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी आजच टीका केली आहे. भाजपाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का, असा सवालच उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. जनतेा हे मान्य आहे का, यावर निवडणुका व्हायला हव्यात असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. देशातील लोकशाही मृतावस्थेत असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धवजींनी आता काही काळ शांत बसावे आणि आम्ही कसं काम करतो ते पाहावे असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना स्वत:च संपवित आहेत – बावनकुळे
उद्धवजी म्हणतात आमची शिवसेना संपू शकत नाही. मात्र शिवसेना ते स्वतःच संपवत आहेत, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. या सगळ्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असेही ते म्हणालेत. हे सगळं उद्धव ठाकरे नैराश्यातून बोलत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. ज्यांना प्रदेशाध्यक्ष केले त्यांच्या नावात किती कुळे आहेत आहेत माहित नाही. पण त्यांची कितीही कुळे उतरली तरी शिवसेना संपू शकणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली होती.
कुळांचा उल्लेख नैराश्यातून – बावनकुळे
आपल्या कुळाचा त्यांनी उल्लेख केला आहे. हा उल्लेख करून जर त्यांचे नैराश्य संपत असेल तर आपल्याला हरकत नाही. अशी प्रतिक्रिया कुळांच्या उद्धव यांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी दिली आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे उदाहरण त्यांनी दिले. पंतप्रधानांनी जनतेला हाक दिली आणि जनता त्याला प्रतिसाद देत आहे. हे अभियान भाजपा पूर्ण करत आहे, याकडे उद्धव ठाकरेंनी राजकीय दृष्टिकोनातून टीका केलेली आहे. त्यांची ही टीका योग्य नाही. त्यांनी अमृत महोत्सवाच्या अपमान केलेला आहे. असेही बावनकुळे म्हणाले. टीकेच्या पातळीवर उद्धव ठाकरे एवढ्या खाली जातील, असे आपल्याला वाटलं नव्हते, असेही बावनकुळे म्हणाले आहेत. अमृत महोत्सवात लोकशाही मृतावस्थेत चालल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला हे प्रत्युत्तर दिले आहे.
लष्करावर केलेल्या वक्तव्याचाही समाचार
जेवढे बजेट मोदीजींनी आणि राजनाथ सिंह यांनी सैनिकांसाठी दिले आहे, तेवढं कोणीच दिले नव्हते. यूपीए सरकारच्या काळात तर ते फारच कमी होते. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सैनिकांच्या संखअयेत कपात करण्याच्या मुद्द्याचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे नैराश्यातून हे सगळं करत आहेत. असे बावनकुळे यांनी वारंवार सांगितले.
शिंदे सरकार चांगले निर्णय घेते आहे – बावनकुळे
उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करतात, पण ते ऐकण्यामध्ये आता कोणालाच इंटरेस्ट नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी मारला आहे. राज्यातील मंत्रिमंडळ अत्यंत सक्षम आहे. चांगल्या प्रकारे खातेवाटप झाले पाहिजे, पालकमंत्री दिले पाहिजेत, याचा प्रयत्न सुरु असल्याचेही बावनकुळेंनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री काय करत होते. ते झेंडावंदन टू झेंडावदन दिसत होते, अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे. शिंदे सरकार अडीच वर्षांमध्ये पाच वर्षाचे काम करून दाखवेल, असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.