गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 16 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी कुणाची? यावरून शरद पवार आणि अजित पवार गटात वाद सुरू आहे. दोन्ही गटाने सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन पक्षावर दावा सांगितला आहे. तसेच दोन्ही गटाकडून मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे आता कोर्ट आणि आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निकालावरून सर्वांच्याच मनात धाकधूक निर्माण झाली आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शरद पवार आणि अजितदादा यांच्या वादावर एक जालीम तोडगा सूचवला आहे. त्यामुळे शरद पवार हा तोडगा मान्य करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रामदास आठवले हे नागपुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं. मग अजितदादा गट शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता देईल. त्यामुळे वादच मिटेल असा जालीम उपाय रामदास आठवले यांनी सूचवला आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवाय शरद पवार यांनी 2014मध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे पवारांनी एनडीएमध्ये यायला हरकत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या काळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे. तसं होत असेल तर राज्य सरकारमध्ये आम्हाला एक मंत्रीपद मिळायला पाहिजे. एक मंत्रिपद आणि दोन महामंडळं रिपाइंला दिली पाहिजे. आम्हाला सत्तेचा वाटा मिळायलाच हवा. आमचे मतदार गावागावात आहेत. ते मतदार भाजपकडे वळवण्यात आमचं योगदान आहे. आम्हाला मंत्रिपद देणं हे भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी फायद्याचंच असेल, असं आठवले यांनी सांगितलं.
भाजप छोट्या पक्षांना संपवत नाही. उलट छोट्या पक्षांना बळ देऊन वाढवण्याचं काम भाजप करत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांच्यामुळेच संपला. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपत काहीच तथ्य नाही, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.
गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. ज्या मराठा समाजाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजावर अन्याय होऊ देऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला.