राम नेवले यांचे निधन, वेगळ्या विदर्भाचे शिलेदार गेले
शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून राम नेवले यांनी कारकीर्द सुरू केली. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत होते. त्यानंतर ते तिथून बाहेर पडले. राम नेवले यांनी संपूर्ण आयुष्य वेगळ्या विदर्भासाठी वाहून घेतले. वेगळ्या विदर्भासाठी होणाऱ्या आंदोलनांचे नेतृत्व केले.
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांचे आज पहाटे दोन वाजता निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. वेगळ्या विदर्भाचे शिलेदार गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
राम नेवले हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे. ८ ऑक्टोबर १९५१ मध्ये त्यांचा जन्म झाला. नरखेडमध्ये त्यांचे कृषी सेवा केंद्र होते. १९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून राम नेवले यांनी कारकीर्द सुरू केली. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत होते. त्यानंतर ते तिथून बाहेर पडले. राम नेवले यांनी संपूर्ण आयुष्य वेगळ्या विदर्भासाठी वाहून घेतले. वेगळ्या विदर्भासाठी होणाऱ्या आंदोलनांचे नेतृत्व केले.
जय विदर्भ पार्टीची केली होती स्थापना
राम नेवले यांनी महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. पण, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारण्यात आली. एचटीबीटी बियाण्याची लागवड करण्यात आली. एका कृषी मासिकाचे संपादनही केले. त्या माध्यमातून शेतीतील वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले.
मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार
राम नेवले यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. राम नेवले यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषी, सामाजिक यांसह इतर क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. वेगळ्या विदर्भासाठी खंबीरपणे लढणार एक लढाऊ आणि खंबीर नेतृत्व गेल्याचं योगेश गिरडकर यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर म्हटले आहे.
पतीऐवजी प्रियकरावर जडला जीव, त्याने केले तिचे शारीरिक शोषण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल