Devendra Fadnavis : मराठवाड्याच्या 49 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं ते सांगा?; फडणवीस यांना आव्हान
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. तसेच ओबीसी तरुणाचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गेलं पाहिजे. उपोषणकर्ते टोंगे या तरुणाची प्रकृती बिघडली आहे. त्याची मुख्यमंत्री दखल घेतली का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नागपूर | 15 सप्टेंबर 2023 : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्याशी संबंधित 75 निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळच औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी सर्व हॉटेल्स आणि विश्रामगृहे बंद ठेवण्यात येणार आहे. सात वर्षानंतर पहिल्यांदाच मराठवाड्यात होणाऱ्या या बैठकीचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी या बैठकीपूर्वीच राज्य सरकारला एक कळीचा सवाल करून सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. 20214 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी 49 हजार 800 रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचं काय झालं? आधी या पॅकेजबद्दल सांगावं, नंतरच नव्या पॅकेजबद्दल सरकारने बोलावं, असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या सरकारचं मराठवाड्याकडे दुर्लक्ष झालं आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या महिन्याभराच्या काळात मराठवाड्यात 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता हे सरकार शेतकरी आत्महत्येबाबत बोलेल. नव्याने पॅकेज जाहीर करेल आणि पुन्हा एकदा मराठवाड्यातील जनतेची फसवणूक होईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
ओबीसींचं आरक्षण देऊ देणार नाही
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी गुप्तपणे काय समझौता केला माहीत नाही. पण त्यांना आम्ही ओबीसींचं आरक्षण देऊ देणार नाही. मी ओबीसींचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला आंदोलनात सामील होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे. त्यांनी वेळ देताच ओबीसी संघटनांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
लबाडा घरचे आवतण
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या निधीवरून टीका केली आहे. मराठवाड्याला निधी म्हणजे लबाडा घरचे आवतण आहे. जेवल्याशिवाय खरे नाही. ज्या जुन्या योजना आहेत त्या तरी पूर्ण करा, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.