विजय वडेट्टीवार यांचं जीआरबाबत धक्कादायक विधान; ओबीसी तरुणांना काय केलंय आवाहन?
कंत्राटी भरतीच्या जाहिरातीवरून विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. आज तहसीलदारांच्या पदाची कंत्राटी जाहिरात काढली आहे. उद्या मुख्यमंत्री पदाची अशीच जाहिरात काढा. सहा सहा महिने कंत्राटी पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद द्या, असा टोला त्यांनी लगावला.
सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 30 सप्टेंबर 2023 : मागण्या तोंडीं मान्य करायच्या होत्या मग बैठक कशाला घेतली? हा फार्स होता. तोंडी आश्वासनावर तोंडाला पान पुसण्याचा काम करण्यात आलं आहे. तोंडी आश्वासनावर ओबीसी नेते कसे समाधानी झाले? ओबीसी नेते तोंडी आश्वासनावर समाधानी झाले याचं आश्चर्य वाटतंय. ओबीसींचे प्रमाणात देणारे नाही असे सरकार म्हणत असले तरी, पैसे देऊन प्रमाणपत्र घेणं सुरू आहे. सरकारचा हा खेळ सुरू आहे. ओबीसी तरुणांनी त्या जीआरचीच होळी केली पाहिजे, असं आवाहनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नाही. तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. पैसे घेऊन मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत. पैसे घेऊन लाखो प्रमाणपत्र झपाट्याने दिले जात आहे.स्वतः अंबादास दानवे यांनी ओबीसींचे प्रमाणपत्र घेतले. त्यांना व्हॅलिडिटीही मिळाली आहे. एका बाजूला पैसे घेऊन ओबीसी प्रमाणपत्र दिले जात असताना बैठका घेऊन सोंग केले जात आहे. हा सरकारचा खेळ ओबीसी जनतेला, नेत्यां का कळत नाही? ओबीसी तरुणांनी या GR ची होळी करावी, असं आवाहनच विजय वडेट्टीवार यांनी केलं,
तर आयुष्याची होळी होईल
ओबीसींमध्ये सर्व जातींना समाविष्ट करण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. पैसे घेऊन प्रमाणपत्र दिले जात आहे. बंजारा समाजातही असेच झाले. आता ओबीसीमध्ये असे खोटे प्रमाणपत्र दिले जात आहे. सरकार जातीजातीमध्ये वाद निर्माण करून लोकांना मूर्ख बनवत आहे. तरुणांनी हे समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी रस्त्यावर उतरायला हवे, नाही तर तुमच्या जीवनाची होळी झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूक आयोग खिशात
अजित पवार गटाला निवडणूक चिन्ह मिळेल काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोग भाजपच्या खिशात आहे. जो भाजपसोबत जाईल त्यांना सर्व दिलं जात आहे. उद्या दोन आमदार फुटले तरी त्या दोन आमदारांनाही चिन्ह दिलं जाईल. कारण निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.
निवडणुकांमुळेच हल्ले
बुलडाण्यात मुस्लिम तरुणाला तर डोंबिवलीत दलित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. हे निवडणूक जिंकू शकत नाहीत म्हणून हे असे कारस्थान करत आहेत. रामाने कुठे जय श्रीराम म्हणा असे म्हटले होते? निवडणूक तोंडावर आली आहे म्हणून असे होते आहे, असं ते म्हणाले.
एसआयटी चौकशी करा
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जातीच्या नोंदी तपासणार असल्याचं कालच्या बैठकीत ठरलं आहे. त्याकडेही त्यांचं लक्ष वेधलं. त्यावर, निश्चितच श्वेतपत्रिका काढली जावी. ज्यांनी नोकऱ्या बळकावल्या आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या जातीचे सर्वेक्षण का करता? जातनिहाय गणना केली पाहिजे. 28 लाख मराठ्यांनी ओबीसींचे प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतला आहे. त्यामुळे सर्व प्रकारची एसआयटी चौकशी करा. गेल्या 5 ते 7 वर्षापासून हे सुरू आहे. मागील दीड वर्षात हे अधिक होऊ लागलं आहे. या प्रकरणाची चौकशी करा. सर्व काही समोर येईल, असंही ते म्हणाले.
शिंदेंचा बळी घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनाला गेले नाही. त्यावरही त्यांनी टीका केली. तीन दिवस झाले, आता कसली नाराजी? पैसे घेत जायचे आणि नाराजी दाखवायची हे सोंग करत आहेत. हे गोंधळी आहेत. महाराष्ट्राला खडा तमाशा दाखवू नका, असा इशारा देतानाच शिंदेंचा बळी घेण्याचे ठरले आहे. विसर्जनाची तयारी सुरू आहे, असंही ते म्हणाले.