Pench Tiger | गंभीर जखमी अवस्थेत फिरत होती वाघीण; मृत्यू कशामुळं झाला असेल यावर चर्चा?
कॅनेन डिस्टेंपर या रॅबीजसारख्या आजारानंही या वाघिणीचा मृत्यू होऊ शकतो. पण, नेमके कारणं शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.
नागपूर : जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील (Pench Tiger Project) सालेघाट परिक्षेत्रातील कक्ष क्र. 625 मध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळली. वन विभागाचे अधिकारी उपसंचालक व पशुवैद्यकीय आधिकारी यांचे पथक घटनास्थळी गेले. जखमी अवस्थेतील या वाघाचे पर्यटकांनी व्हिडीओ काढून तो जखमी दिसत असल्याची माहिती वनविभागाला दिली होती. व्हिडीओनुसार सदर वाघाचे चालीत अनैसगिकता आढळली. त्यामुळं वनकर्मचारी या वाघाचे संनियत्रण करत होते. परंतु 28 डिसेंबरला दुपारी हा वाघ मृत आढळून आला. वन विभाग आता या वाघाचा मृत्यू कशामुळे झाला तो जखमी झाला होता का याची चौकशी करत आहे.
जखमी अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल
पेंचच्या सालेघाट वनपरिक्षेत्रात टी 35 वाघिणीचे वास्तव्य होते. ती सात-आठ वर्षांची होती. 27 डिसेंबरला या वाघिणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. वनविभागाच्या ट्रप कॅमेऱ्यातही ती व्यवस्थित चालत नसल्याचं दिसून आलं. कसल्यातरी त्रासामुळं ती ओरडत होती. मंगळवारी ती मृतवस्थेत सापडली. डॉक्टरांच्या टीमनं पाहणी केली. त्यात तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही जखमा दिसून आल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल, असं पेंचचे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ला यांनी सांगितलं. दरम्यान, पाऊस सुरू होता. त्यामुळं वाघिणीला आणण्यात अडचणी येत होत्या.
कशानं झाला मृत्यू
शिकार करताना पाठीला अंतर्गत जखम झाली असावी. त्यामुळं तिला उठण्याबसण्यास त्रास होत असेल. मात्र, बाह्य जखम नसावी. कारण तसं तिच्या शरीरावर काही दिसत नव्हतं. विषारी सापानं चावा घेतल्यास कदाचित तिच्या मृत्यू होऊ शकतो. किंवा अर्धांगवायूनंही तिला उठणे शक्य झालं नसेल. म्हणून तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कॅनेन डिस्टेंपर या रॅबीजसारख्या आजारानंही या वाघिणीचा मृत्यू होऊ शकतो. पण, नेमके कारणं शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.