Nagpur Blood डागा मेट्रो ब्लड बँकेच्या प्रतीक्षेत, का झालं अर्धवट काम?
शहरात बँक नॅटयुक्त आहेत. येथे रक्ताची सक्ती केली जाते. येथे अधिकचे शुल्क अदा करावे लागते. त्यामुळे जनतेची रक्तासाठी होणारी ससेहोलपट थांबविणे गरजेचं आहे.
नागपूर : आरोग्य विभागानं डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात मेट्रो ब्लड बँक मंजूर केली. यंत्रसामग्री आली. बांधकाम झाले. 16 कर्मचारी नियुक्त झाले. ब्लड बँकेचा फलक लागला. पण, काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळं मेट्रो ब्लड बँक केव्हा सुरू होईल, असा सवाल विचारला जात आहे.
डागा रुग्णालयात रोज सुमारे 30 ते 40 प्रसूती होतात. यातील 15 मातांच्या प्रसूती शस्त्रक्रियेतून होतात. अशावेळी अतिरिक्त रक्ताची गरज लागते. याशिवाय थॅलेसेमिया आणि सिकलसेलग्रस्त मातांसाठी या रक्तपेढीची सर्वाधिक मदत होईल. सर्वांत मोठी गरज डागात प्रसूतीसाठी येणार्या महिलांना होणार होती.
55 लाखांचा झाला खर्च
रक्तदानानंतर एका व्यक्तीच्या शरिरातील आजार दुसर्या शरीरात पसरण्याची भीती जास्त आहे. त्यामुळेच नॅट तंत्रज्ञानयुक्त मेट्रो ब्लड बँकचा पर्याय पुढे आला. यानुसार 55 लाख रुपये खर्च करून डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ही मेट्रो ब्लड बँक उभारण्याचा निर्णय झाला. सहा वर्षे लोटूनही डागातील ही ब्लड बँक तयार झाली नाही. नाईलाजास्तव नागरिकांना नॅटयुक्त रक्तासाठी खासगी ब्लड बँकेकडं जावं लागतं. येथे त्यांना अधिकचे शुल्कही भरावे लागते. जनतेची रक्तासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेट्रो ब्लड बँका सुरू करणं गरजेच आहे.
खासगीत मोजावे लागते अधिकचे शुल्क
सहा वर्षांपूर्वी पहिली मेट्रो ब्लड बँक मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या परिसरात सुरू करण्यात आली. नागपुरात मेट्रो ब्लड बँक सुरू झाल्यास विदर्भातील जनतेला नॅट तपासणीयुक्त रक्त मिळेल. या हेतूनं नागपूरसह, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, परभणी, ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा आणि नाशिक या शहरांमध्ये मेट्रो ब्लड बँक केंद्राच्या सहकार्यातून उभारण्यात येणार होत्या. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही घोषणा केली होती. मात्र, मुंबई वगळता मेट्रो ब्लड बँकेच्या उभारणीसंदर्भात कोणतेही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. शहरात बँक नॅटयुक्त आहेत. येथे रक्ताची सक्ती केली जाते. येथे अधिकचे शुल्क अदा करावे लागते. त्यामुळे जनतेची रक्तासाठी होणारी ससेहोलपट थांबविणे गरजेचं आहे.