Nagpur ZP | आम्हाला गणवेश केव्हा मिळेल? विद्यार्थी विचारतात झेडपीला प्रश्न
जिल्हा परिषदेकडून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सेस फंडामध्ये करण्यात आलेला गणवेशाचा निधी शाळांकडे वळता करण्यात आलेला नाही. त्यामुळं या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील 15 हजार 600 वर विद्यार्थ्यांना आजही गणवेशाची प्रतीक्षा लागून आहे.
नागपूर : ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. पण, ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी अजूनही गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं आम्हाला गणवेश केव्हा मिळेल, असा प्रश्न हे विद्यार्थी जिल्हा परिषदेला विचारत आहेत.
15 हजार 600 विद्यार्थी करतात गणवेशाची प्रतीक्षा
शासनाच्या निर्देशानंतर ग्रामीण भागातील इयत्ता पहिलीपासून सर्वच वर्ग सुरूही झालेत. विद्यार्थी उपस्थितीही टप्प्याटप्प्याने वाढत आहे. समग्र शिक्षाअंतर्गत राबविण्यात येणार्या मोफत गणवेश योजनेचा निधीही शाळांना वळता झालाय. यामधून एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील मुले तसेच सर्व मुलींना गणवेशाचे वितरणही करण्यात आले. तर काही ठिकाणी गणवेश वितरण सुरू झालेत. पण, जिल्हा परिषदेकडून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सेस फंडामध्ये करण्यात आलेला गणवेशाचा निधी शाळांकडे वळता करण्यात आलेला नाही. त्यामुळं या ओबीसी व खुल्या प्रवर्गातील 15 हजार 600 वर विद्यार्थ्यांना आजही गणवेशाची प्रतीक्षा लागून आहे.
पहिली ते आठवीच्या झेडपीतील विद्यार्थ्यांना मिळतात गणवेश
यंदाचे अर्धे शैक्षणिक सत्र संपले. त्यानंतर राज्य शिक्षण परिषदेने समग्रचा 1 कोटी 98 लाख 64 हजारांचा निधी शिक्षण विभागाकडे वळता केला. यातून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणार्या इयत्ता पहिली ते आठवीच्या 66 हजार 216 विद्यार्थ्यांना एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मिळेल. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वळताही झालाय. त्यांनी गणवेशाचे ऑर्डरही दिले आहेत. काही ठिकाणी गणवेश शाळांकडे प्राप्तही झाले आहेत. त्याचे विद्यार्थ्यांना वितरणही करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा परिषदेच्या सेसफंडात ठणठणाट
जि.प.मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. तेव्हापासून प्रथमच इतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळत आहेत. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून सभापती भारती पाटील यांनी पुढाकार घेतला. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सेस फंडाच्या निधीतून गणवेश देण्याची योजना आखली. गतवर्षी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशही प्राप्त झाला. मात्र, यंदा समग्रचा निधी आल्यानंतरही जि.प.कडून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत कुठलेही नियोजन नसल्याचे दिसते. राज्य शासनाकडे जि.प.चा कोट्यवधी थकल्याने जि.प. सेसफंडात ठणठणाट आहे. अशात कार्यालयीन खर्च भागविणेच कठीण जात आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निधी अद्यापही शाळांकडे वळता झाला नसल्याचे सांगण्यात येते.