Nagpur Sports | कुस्तीपटू समीक्षाचा ग्रॅपलिंग स्पर्धेत दिल्लीत झेंडा! पण, भिलगाव ते नागपूर सायकलिंगचा प्रवास काही संपेना
भिलगाव ते मानकापूरचे अंतर 12 किलोमीटरचे आहे. सकाळी जाणे-येणे पुन्हा संध्याकाळी सरावासाठी ये-जा करणे यात तिचा 48 किलोमीटरचा सायकलचा प्रवास होतो.
नागपूर : समीक्षा कोचे भिलगावची कुस्तीपटू. परतवाडा येथील विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेतील ब्रॉंझपदक पटकावले. त्यानंतर सातारा येथील शालेय स्पर्धेतील ब्रॉंझपदक प्राप्त केले. दिल्ली येथील ग्रॅपलिंग स्पर्धेत प्रथमच जिंकलेल्या ब्रॉंझपदकाने समीक्षाने दिल्लीत झेंडा रोवला. पण, भिलगाव ते मानकापूर असा 48 किलोमीटरचा सायकलचा तिचा प्रवास काही संपेना. 19 वर्षीय समीक्षाची कुस्तीपटू बनण्यासाठीची ही सारी धडपड…
समीक्षा कोचे ही भिलगावात राहते. नवव्या वर्गात असताना क्रीडा शिक्षक नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनात तीनं कुस्तीचे धडे घेतले. मानकापूर येथील रेसलिंग अकादमीत तीनं प्रवेश घेतला. तेव्हा कुठे समीक्षाचा कुस्तीचा प्रवास सुरू झाला. मात्र, भिलगाव ते मानकापूरचे अंतर 12 किलोमीटरचे आहे. सकाळी जाणे-येणे पुन्हा संध्याकाळी सरावासाठी ये-जा करणे यात तिचा 48 किलोमीटरचा सायकलचा प्रवास होतो.
दंगल कशी लढणार
कुस्तीमध्ये आहार (डायट) महत्त्वाचा असतो. त्याबाबात नीलेश राऊत यांच्यासह विशाल डाके व दिलीप इटनकर यांचे तिला मार्गदर्शन मिळते. पण, फक्त मार्गदर्शनाने होत नाही. त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. पैशांच्या अभावी तिच्या आहारावरही परिणाम होतोय. नागपूर व विदर्भात कुस्तीला अनुकूल वातावरण नाही. त्यामुळं सहसा तरूणाई या खेळात करिअर करण्यास इच्छुक नाहीत. महिला कुस्तीची अवस्था तर आणखीनच वाईट आहे. तरीही समीक्षाने हिंमत करून पहेलवान बनण्याचा निर्णय घेतला. तिने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून दिली.
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडविणार
अजूनही नागपूरची महिला कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली नाही. याचे दुःख कुस्तीच्या पदाधिकाऱ्यांसह समीक्षालाही आहे. त्यामुळेच समीक्षाने भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाय स्पोर्ट्स कोट्यातून पीएसआय बनण्याचे तिचे स्वप्न आहे. मुलींसाठी अकादमी स्थापन करून नागपुरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडविण्याचेही तिचे स्वप्न आहे.
दंगलीलाही आहेत मर्यादा
समीक्षा एसएफएस कॉलेजमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षात शिकत. समीक्षाचे वडील दिलीप कोचे मिस्त्रीकाम करतात, तर आई (प्रभा कोचे) गृहिणी आहे. कुटुंबात चार बहिणी असल्यानं एक बहीण खासगी काम करते. त्यामुळं कुटुंबाला हातभार लागतो. आईवडिलांनी समीक्षाचे क्रीडाप्रेम जपले आहे. तिच्या पाठीशी ते नेहमी उभे राहतात. दंगल पाहण्यासाठी वडील तिला सोबत घेऊन जातात. पण, त्यांनाही मर्यादा आहेत.