Bhandara Yatra | कुंभलीतील दुर्गाबाईची यात्रा रद्द; तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे काय पाठविला प्रस्ताव?
दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा असणार्या दुर्गाबाई डोहावर मकरसंक्रातीनिमित्त भरणारी यात्रा गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या प्रभावामुळे रद्द झालेली आहे. गतवर्षीही यात्रा कोरोना प्रतिबंधात्मक नियमामुळे रद्द झाले होते. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रांवर बंदी आणण्यासंदर्भात आदेश काढण्यासंदर्भातील प्रस्ताव तहसीलदारांनी पाठविला आहे.
तेजस मोहतुरे
भंडारा : मकरसंक्रातीच्या पर्वावर कुंभली, (Kumbhali) धर्मापुरी शिवारात चुलबंद नदीच्या दुर्गाबाई (Durgabai) डोह तीरावर ही यात्रा गेल्या दीडशे ते दोनशे वर्षापासून भरते. दुर्गाबाई व तिच्या सात भावांच्या स्मरणार्थ येथे यात्रा भरते. विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उडीसा इत्यादी राज्यातून लाखो भाविक यात्रेला येत असतात. चौदा ते पंधरा जानेवारीला मकरसंक्रातीला ही यात्रा भरते. ही यात्रा पाच दिवस चालते. यात्रेतील शेकडो दुकानांमधील खरेदी-विक्री व्यवहार लाखो रुपयांची होत असते. ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू यात्रेत उपलब्ध असतात. पारंपरिक शेतीकरिता कुठेही उपलब्ध न होणारी सर्व अवजारे येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. मात्र यंदाही कोरोना काळाची परिस्थिती लक्षात घेता यात्रेला चार ते पाच दिवस उरले असले तरी यात्रेच्या नियोजनाबाबत कोणतेही संकेत दिसत नाही.
यंदाही यात्रा भरणार नाही
कोरोनाच्या तिसर्या लाटेची चर्चा असताना भंडारा जिल्ह्यातील आता रुग्ण वाढून येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सिहोरा परिसरात बपेरा, वांगी, सुकळी आनंद भागात भरणारी मकर संक्रांतीची यात्रा जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्याचे वृत्त आहे. मात्र दुर्गाबाई डोह येथील यात्रेला जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट निर्देश दिले नसल्याने भाविकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण आहे. याविषयी साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुंभली यात्रेबाबत प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले असून, याहीवर्षी यात्रा भरणार नाही हे स्पष्ट सांगितले.
गर्दीत सामाजिक अंतराचे नियम पाळणे शक्य नाही
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये सामाजिक अंतर किंवा कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे शक्य नाही. त्यामुळे ही यात्रा भरणारच नाही ही परिस्थिती स्पष्ट झाली. कोरोनाचा काळ लक्षात घेता वाढती रुग्ण संख्या आणि त्याचे होणारे वाईट परिणाम ही परिस्थिती लक्षात घेऊन सुरुवातीलाच उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनी त्यावर रिमार्क मारून जिल्हाधिकारी यांच्याकडे माहितीस्तव पाठविले. यावर्षी कुंभली येथील दुर्गाबाई डोहाची यात्रा भरणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.