नागपुरात युवक काँग्रेस रस्त्यावर, पोलिसांनी नाना पटोलेंना उचलून नेलं, जोरदार हालचाली
नागपुरात आज अचानक हालचाली वाढल्या. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांच्याकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचा मोर्चा विधान भवनाच्या दिशेला निघाला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलनात नाना पटोले देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनाही पोलिसांनी उचलून नेलं.
नागपूर | 8 डिसेंबर 2023 : विधी मंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपुरात अधिवेशन सुरु आहे. असं असताना नागपुरात युवक काँग्रेसचा मोठा मोर्चा विधान भवनाच्या दिशेला निघाला. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व आंदोलक तरुण आक्रमक झाले. या तरुणांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील सहभागी झाले. त्यांनी प्रसारमाध्यांना आंदोलन करण्यामागील कारण सांगितलं. पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
‘सरकारने महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटलं’
“हे सरकार तरुणांचा आवाज दाबायला लागलं आहे. तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळेसही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटलं. नोकऱ्या दिल्या नाहीत. महाराष्ट्रात लाखो पदं खाली आहेत. कंत्राटी भरतीच्या नावाने हे तरुणांचे आयुष्य बदनाम करत आहेत. म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुण-तरुणींचा मोर्चा विधान भवनावर निघाला आहे. सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल”, असं नाना पटोले म्हणाले.
‘तरुणांचा उद्रेक होणं साहजिक’
“आम्ही सगळे जेलभरु. पण या सरकारशी दोन हात केल्याशिवाय युवक काँग्रेस शांत बसणार नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे सरकार तरुणांचं आयुष्य खराब करायला निघालं. पोलीस दलातही मोठी पदं खाली आहेत. सर्व विभागात पदं खाली असताना ऑनलाईनच्या नावाने तरुणांना लुटलं जात आहे. हे चीटफंडवालं सरकार आहे. या सरकारने पिढी बदनाम करण्याचं काम केलं. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणं साहजिक आहे”, अशी भूमिका नाना पटोल यांनी मांडली.
“महाराष्ट्रात 25 लाख पदं खाली पडली आहे. सरकार ही पदं भरायला तयार नाही. त्यामुळे तरुणांचा हा उद्रेक बघायला मिळतोय. शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही बॅरिकेट्स काय सरकारच्या भिंती तोडून त्यांच्या छातडावर बसून आम्ही न्याय मिळवून देऊ”, असं नाना पटोले म्हणाले.